Gustaakh Ishq Teaser: प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि कॉट्यूरिएर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ‘स्टेज 5 प्रोडक्शन’ अंतर्गत, मनीष मल्होत्रा चित्रपट निर्माता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांनी सोशल मीडिया हँडलवर याची घोषणा केली आणि चित्रपटाच्या रिलीजचा महिनाही सांगितला आहे.
मनीष मल्होत्रा यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘लहानपणापासूनच मला सिनेमाबद्दल खूप प्रेम आहे… कथांची जादू, मोठ्या पडद्याची चमक आणि क्रेडिट्स रोल झाल्यानंतरही मनात राहणाऱ्या भावना मला आकर्षित करतात. आज मला माझं स्वप्न पूर्ण होताना पाहून खूप आनंद होत आहे.’ फॅशन सेन्समुळे मनीष मल्होत्रा घराघरात प्रसिद्ध झाले आहेत.
आता, नोव्हेंबर २०२५ मध्ये रिलीज होणाऱ्या त्यांच्या पहिल्या रोमँटिक चित्रपटाद्वारे, मनीष मल्होत्रा त्यांच्या स्वतःच्या ‘स्टेज 5 प्रोडक्शन’ या बॅनरखाली चित्रपट निर्मितीच्या जगात पाऊल टाकत आहेत. जुन्या दिल्लीच्या गल्ल्या आणि पंजाबच्या कोठ्यांमध्ये घडलेली ‘गुस्ताख इश्क’ ही उत्कटता आणि न सांगितलेल्या इच्छांची एक प्रेमकथा आहे. ही कथा अशा जगातून प्रेरित आहे जिथे वास्तुकला आठवणी जतन करते आणि संगीत इच्छांनी भरलेले आहे.
विभु पुरी दिग्दर्शित या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, शारिब हाशमी, विजय वर्मा आणि फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर चित्रपटाचं संगीत विशाल भारद्वाज यांनी दिलं आहे. ‘धडक २’ आणि ‘सैयारा’ नंतर आता ‘गुस्ताख इश्क’ प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.