दुर्गा पूजेदरम्यान काजोलचा 'दुर्गावतार', चप्पल घालून पंडालमध्ये आलेल्या पापाराझींना सुनावले खडेबोल, म्हणाली...
सध्या संपूर्ण देशात नवरात्रीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. शिवाय, दुर्गापूजाचा सणही देशभरात साजरा केला जात आहे. देवीची पूजा अर्चना करण्यासाठी सामान्य भक्तांसह सेलिब्रिटी दुर्गा पंडालमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. अशातच सोशल मीडियावर दुर्गापूजा दरम्यानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री काजोल देवगण पापाराझींवर भडकलेली दिसतेय. नेमकी ती का भडकलीये ? जाणून घेऊया…
दरवर्षी आपण दुर्गापूजा करताना सेलिब्रिटींना पाहतो. काजोल देवगण, अजय देवगण, राणी मुखर्जी आणि जया बच्चन हे सेलिब्रिटी दुर्गापूजासाठी दरवर्षी स्पॉट होतात. यावर्षीही सेलिब्रिटी स्पॉट झाले. दुर्गापूजेदरम्यानचे अभिनेत्री काजोलचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती पापाराझींवर भडकल्याचे दिसत आहे. अभिनेत्रीचं दुर्गापूजाच्या पांडालमध्ये रौद्र रुप दिसल्याने अभिनेत्री कमालीची चर्चेत आली आहे.
दुर्गापुजेच्या ठिकाणी चप्पल घालून येणाऱ्या आणि चुकीच्या प्रकारे वर्तन करणाऱ्यांवर काजोल ओरडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. काजोलने ओरडून बाजूला होण्यास सांगितले आणि शूज घालून आत येणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. काजोलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी तिचं कौतुक करताना दिसत आहेत. नेटकरी म्हणतात की, काजोलने जे काही केले, ते योग्य केले. पूजेत शूज घातले तर कुणालाही राग येईल, असे युजर्सचे म्हणणे आहे.
दरम्यान, काजोलने गुलाबी आणि जांभळ्या रंगाची साडी घातली होती. यावेळी तिने नेकलेस आणि कानातले घातले होते. काजोल कमीतकमी मेकअप आणि बन लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. काजोल जेव्हा पूजेला शूज घालून आलेल्यांना ओरडत होती, तेव्हा आलिया भट्टही तिथे उपस्थित होती. यावेळी आलिया तनिषा मुखर्जीच्या शेजारी उभी होती. ती तिची बहीण शाहीन भट्टसोबत दुर्गापुजेसाठी आली होती.