
फोटो सौजन्य - Social Media
सोशल मीडियावर कलाकारांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. ट्रोलिंग हा त्यांच्यासाठी अतिशय सामान्य विषय होऊन जातो. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असे क्षण येतातच. असेच काही अभिनेता कपिल होनरावसोबत घडले आहे. नुकतेच कपिलने स्वतःच्या हक्काचे घर घेतले आहे. त्यामुळे त्याच्या घरी गृहपूजेचे आयोजन करण्यात आले होते. कपिलने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना रिलच्या माध्यमातून शेअर केली होती. दरम्यान, त्याला काही ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.
अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टखाली एका नेटकऱ्याने “होनराव म्हणजे तू मराठी ना? बायको भैय्यानी (उत्तर प्रदेशातील) आहे की काय? अरे, महाराष्ट्र आपला आहे आणि आपण महाराष्ट्रातले! आधीच या रिक्षावाल्यांनी गर्दी करून ठेवली आहे. निदान ती पूजा तरी आपल्या पंडिताला घेऊन करायची की? काय अभिमान आहे की नाही महाराष्ट्राचा?” असे नमूद केले आहे. नेटकऱ्याने केलेली ही टिप्पणी अभिनेत्याने धुडकावून लावल्याचे दिसून येत आहे. त्याने या ट्रोलिंगला प्रतिउत्तर देत एक इंस्टाग्राम स्टोरी प्रसिद्ध केली आहे.
नेटकऱ्याने केलेल्या टिप्पणीवर अभिनेत्याने उत्तर देत लिहिले आहे की “काय करायचं ह्यांचं? याला तर महाराष्ट्रही नीट लिहता येत नाही. Actors trolling is now pathetic level.” नेटकरी आणि अभिनेत्यातील हा संवाद मराठी टीव्ही क्षेत्रात फार चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर या प्रकरणावर अनेक मते देण्यात येत आहेत तर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मराठी टीव्ही मालिकेतून अभिनेता कपिल होनराव महाराष्ट्रातील घराघरात पोहचला. त्याची पत्नी ही महाराष्ट्रीय नसून उत्तर प्रदेशातील आहे. नुकतेच, अभिनेत्याने उत्तर प्रदेशात साजरा केला जाणारा सण ‘करवाचौथ’ ही त्याच्या पत्नीसह साजरा केला होता. याचे फोटोज त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान, अभिनेत्याने नुकतेच नवीन घर घेतले आहे आणि त्या घराची गृह पूजाही संपन्न झालेले क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे आणि त्यात असा ट्रोलिंगचा प्रकार घडला आहे.