"शाहरूखच्या समाजकार्याबद्दल काय काय सांगू?"; किरण मानेने शाहरूख खानला दिल्या हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा
बॉलिवूडचा ‘बादशाह’ आणि ‘किंग खान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज ५९ वा वाढदिवस आहे. शाहरुख खानला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. फक्त देशातच नाही तर जगभरामध्ये शाहरुखचे फॅन्स आहेत. त्याचे चाहतेही अनेक सेलिब्रिटी आहेत, त्याच्यासोबत काम करावे, ही अनेक सेलिब्रिटींची इच्छाही आहे. अशातच बिग बॉस मराठी फेम आणि मराठमोळा अभिनेता किरण मानेने शाहरुख खानसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये किरण मानेंनी आपल्या खास शैलीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता किरण माने लिहितो, “ॲसिड ॲटेक झालेल्या महिलांवर उपचार करणं, त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहर्यावर स्वखर्चानं प्लॅस्टिक सर्जरीसारखी महागडी ऑपरेशन्स करणं, त्यांच्यावर मानसिक उपचार करुन त्यांच्या मनाला उभारी देणं आणि त्यांना स्वत:च्या पायांवर उभं रहाण्यासाठी सगळी आर्थिक मदत करणं… ही सगळी कामं तो गेली कित्येक वर्ष करतोय ! आपल्या आई- वडिलांच्या आठवणीसाठी नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यानं लहान मुलांच्या कॅन्सरवरच्या उपचारांसाठी एक वॉर्ड उभा केलाय, ज्यासाठी तो सतत मोठ्ठी आर्थिक मदत करत असतो! २०१२ साली त्यानं देशभरातली बारा खेडेगावं दत्तक घेतली. तिथं स्वखर्चानं वीज- पाणी- शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्यानं केलं. अजूनही तिथं नवनवीन सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम तो आजतागायत करतोय !”
“भारतभरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांच्या छोट्या- मोठ्या इच्छा- स्वप्न पूर्ण करणार्या ‘मेक अ विश फाऊंडेशन’ या समाजसेवी संस्थेबरोबर तो काम करतो ! महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटूंबीयांसाठी त्यानं जगभर कॉन्सर्ट करुन कोट्यावधी रूपये उभे केले तर इंडियन आर्मीमधील जवानांसाठी सात कोटी रूपये दिले! कोरोनाकाळात त्यानं स्वत:चं चार मजली ऑफिस बीएमसीला दिलं. लॉकडाऊनमध्ये मुंबईत १००० गरीब कुटुंबांना तेल, पीठ, तांदूळ, डाळीसह अनेक सामान त्याने पुरवले. अगदी हातावर पोट असलेल्या २००० लोकांना रोज ताजं अन्न दिलं. बंगालमधल्या अतिशय दुर्गम खेड्यापाड्यांमध्ये जाऊन रेशन आणि सॅनिटायझर पुरवले. शाहरूखच्या समाजकार्याबद्दल काय काय सांगू? मी लिहीत जाईन पण तुम्ही वाचून वाचून थकून जाल.”
“त्याच्याविषयी कुणी कितीही अफवा पसरूद्यात. कुणी म्हणेल पाकिस्तानला त्यानं ह्यॅव दिलं आणि त्यॅव दिलं. सगळ्या थापा आहेत हो. अहो, अन्नदान करताना सुद्धा धर्म बघून करणार्या त्या दळभद्र्या जमाती… त्यांना ‘द ग्रेट शाहरूख खान’ कसा झेपणार? त्यांनी कितीही ट्रोल केलं तरी सगळ्या जगात शाहरूखनं भारतीय कलाकारांचा सन्मान वाढवलाय हे सत्य लपणार नाही! त्यानं केलेल्या समाजोपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमध्ये झालेल्या २० व्या युनेस्को अवॉर्डसमध्ये स्पेशल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलंय. तो फक्त अभिनयातला बादशाह नाही, तर ‘माणूस’ म्हणून सुद्धा किंग आहे! सलाम शाहरूख खान… कडकडीत सलाम!! कुठल्याही सच्च्या भारतीयाला तुझा अभिमानच वाटेल… आज तू साठाव्या वर्षात पाऊल ठेवतोयस. तुला वाढदिवसाच्या मनाच्या तळापास्नं शुभेच्छा”