"आम्हाला लग्नंच करायचं नव्हतं", आमिर सोबतच्या घटस्फोटानंतर किरण रावचा धक्कादायक खुलासा
अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शिका किरण राव यांचा चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. १६ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर आमिर आणि किरणने २०२१ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. किरण- आमिरच्या घटस्फोटाचे वृत्त ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. जरीही त्यांचा घटस्फोट झाला असला तरीही ते दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. आयरा खानच्या लग्नावेळीही दोघे एकत्र स्पॉट झाले होते. त्या शिवाय काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या ‘लापता लेडीज’च्या प्रमोशनवेळीही दोघे एकत्र स्पॉट झाले होते. किरण रावने पुन्हा एकदा घटस्फोटावर भाष्य केलं आहे.
किरण रावने नुकतंच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आमिर खानसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे. आमिरसोबत लग्न करायचं नव्हतं, असा गंभीर खुलासा किरणने केला आहे. शिवाय आमच्यासाठी घटस्फोट घेणं खूपच सोप्प होतं, असंही ती म्हणाली आहे. मुलाखतीत किरणने आमिरसोबतच्या नात्यावर प्रतिक्रिया दिलं की, “आम्ही लग्नानंतर आमच्या नात्यावर चांगल्या प्रकारे काम केलं होतं. आम्ही दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय विचारपूर्वक घेतला होता. त्यामुळे आमच्यासाठी घटस्फोट घेणं फार सोप्प झालं होतं. आम्ही आपआपसात केव्हा भांडलोही नाही. जरी कधी आमच्यात भांडणं झाली तरीही ते काही तासांतच मिटून जायची.”
पुढे किरण राव म्हणाली की, “आम्हाला लग्नही करायचं नव्हतं, याचा अर्थ असा नाही की, आमचं एकमेकांवर प्रेम नव्हतं किंवा आम्ही एकमेकांना आवडत नव्हतो. प्रत्येक पार्टनरच्या नात्यात अनेक गोष्टी आपल्याला आवडतात तर काही गोष्टींचाही आपल्याला राग येतो. ज्यामुळे वाद होतो. पण तरीही काही गोष्टींमुळे तुम्ही त्या माणसाशी लग्न करतात. आमिर माझा एक चांगला मित्र आहे. सोबतच तो माझा एक गुरूही आहे. त्याने मला अनेक गोष्टींमध्ये सपोर्ट केला आहे. पण त्याच्या काही गोष्टींमुळे माझी फार चिडचीड व्हायची. पण शेवटी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवता हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तुम्हाला रिलेशनशिपबाबतची निगेटिव्ह गोष्ट सोबत ठेवायची आहे की इतक्या वर्षांतली कोणती चांगली गोष्ट? मी आमच्या नात्यातल्या चांगल्या गोष्टी सोबत ठेवायचं ठरवलं. आणि घटस्फोट घेत बाकीच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.”