कॉमेडियन कृष्णा अभिषेकच्या पत्नीच्या कारचा भीषण अपघात, कश्मिरा शाहने शेअर केली हेल्थ अपडेट
‘लाफ्टर शेफ’ शोच्या माध्यमातून कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोच्या माध्यमातून हे कॉमेडियन कपल प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करत आहे. अशातच कृष्णा अभिषेकच्या पत्नीबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे. कश्मिरा शाह हिचा अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलस शहरात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अभिनेत्री थोडक्यात बचावली आहे. अभिनेत्रीने अपघात झाल्याची माहिती स्वत: इन्स्टाग्रामवरून दिली आहे.
कश्मिराने काही तासांपूर्वी स्वत: इन्स्टाग्रामवर अपघातासंबंधिची माहिती शेअर केलेली आहे. अभिनेत्री म्हणते, “या अपघातातून मला वाचवल्याबद्दल देवाचे आभार. विचित्र अपघात. काहीतरी मोठी घटना घडणार होती, पण थोडक्यात सर्व काही निभावलं. आशा आहे की या जखमांचे व्रण माझ्या शरीरावर राहणार नाहीत. प्रत्येक दिवसातला एक एक क्षण जगा. आज मला माझ्या कुटुंबाची फार आठवण येतेय.” असं लिहित कश्मिराने पुढे पती कृष्णाचं आणि आपल्या दोन मुलांचं नावही पोस्टमध्ये मेंशन केलं आहे.
अभिनेत्रीने फोटो शेअर करताच चाहत्यांना तिच्या तब्येतीची काळजी वाटत आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सच्या माध्यमातून तिची विचारपूस केली आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे कपडे रक्ताने माखलेले पाहायला मिळत आहेत. या अपघातात अभिनेत्री सुदैवाने बचावली असून मोठी हानी थोडक्यात टळली आहे. कृष्णा अभिषेक आपल्या पत्नीसोबत आणि दोन मुलांसोबत लॉस एंजेलिसला गेला होता. पण कृष्णा अभिषेक आणि त्याचे दोन मुलं ७ नोव्हेंबरला भारतात आले. पण काही कारणास्तव कश्मिरा लॉस एंजेलिसला थांबली आहे. आता अपघातानंतर अभिनेत्री भारतात केव्हा येणार? हे अद्याप अस्पष्ट आहे.
कश्मिरने शेअर केलेल्या पोस्टवर कृष्णा अभिषेकनेही कमेंट केली आहे. तो म्हणतो, “देवाच्या कृपेने तू ठीक आहेस.” याशिवाय काश्मिराच्या चाहत्यांनी आणि अनेक तिच्या सेलिब्रिटी मित्रांनीही तिला या अपघातातून सावरण्यासाठी धीर दिला. शिवाय तिच्याबद्दल काळजीही व्यक्त केली. दरम्यान, कश्मिराचा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आलेली नाही. पण तिने शेअर केलेला फोटोपाहून आपल्याला अपघाताची भीषणता किती असेल हे पाहायला मिळतंय. कश्मिराने ‘लालबाग परळ’, ‘शिकारी’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून ती हिंदी फिल्मइंडस्ट्रीतही सक्रिय आहे.