फोटो सौजन्य - सोशल मीडिया
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही घरी गणरायाचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटींना त्यांनी आपल्या ‘वर्षा’ या शासकीय निवासास्थानी गणरायाच्या दर्शनाला आमंत्रित केले होते. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पााचे दर्शन घेतल्यानंतर त्यासोबतच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अनेक मराठी सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता अभिजीत खांडकेकरनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी आपला अनुभव शेअर केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये श्रेया बुगडे म्हणते, “प्रथेप्रमाणे यंदाही ‘वर्षा’वरून बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रण आले! आणि नेहेमीप्रमाणे खूप आनंद वाटला. मुख्यमंत्रीसाहेब आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांनी, सहकार्यांनी आपुलकीने केलेला पाहुणचार कायम मनात राहतो! रुचकर मेजवानी, कलाकार मित्र मैत्रिणींची भेट, गप्पा आणि बाप्पाच्या आरतीचा मान खूप प्रसन्न वाटलं! ह्या सगळ्यासाठी साहेब तुमचे, तुमच्या सगळ्या कुटुंबियांचे ,सहकार्यांचे व वर्षावरील सर्व कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार!!!”
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री हेमांगी कवी म्हणते, “मुख्यमंत्री साहेबांच्या घरचा गणपती! उत्तम आदरातिथ्य, पाहुणचार, सन्मान, बाप्पाचं दर्शन, भारावून टाकणारी आरती आणि प्रसाद म्हणून अतिशय रुचकर जेवण! मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी मौज आली, मस्त वाटलं, अगदी घरच्यासारखंच वाटलं कारण तुम्ही आम्हांला तसं मानता! खूप खूप धन्यावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब! एक ठाणेकर म्हणून माझ्या मन:पुर्वक सदिच्छा कायम तुमच्या सोबत असतील.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आणि त्यांच्या गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर अभिनेता अभिजीत खांडकेकर यानेही आपल्या भावना पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. “मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे ह्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावरच्या गणपती दर्शनासाठी जायचा योग आला. वेळात वेळ काढून आपण प्रत्येकाला भेटलात आपुलकीने चौकशी केलीत, उत्तम पाहूणचार केला ह्याबद्दल मनापासून आभार. संपूर्ण मराठी कलाकार उपस्थित असल्याने जणू आपल्या कुटुंबाबरोबर आरती करताना जो आनंद, उत्साह जाणवतो तसाच अनुभव आला. मा.डॉ. श्रीकांतजी शिंदे, सचिनजी जोशी, सुशांत शेलार, मंगेश देसाई, सचिन नारकर, वर्षा बंगल्यावरचे सर्व कर्मचारी, पोलिस मित्र, माध्यम प्रतिनिधी आपण दिलेल्या प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार”
गेल्या काही वर्षांपासून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी गणेशोत्सव असेल किंवा दिवाळीच्या वेळी असेल मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारांना आवर्जुन बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रण दिलं जात आहे. यंदाही मुख्यमंत्र्यांच्या घरी मराठी मनोरंजन विश्वातील आणि बॉलिवूड विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी सर्व कलाकारांना वेळ देत त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. शिवाय त्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढून सर्वांचा पाहुणचारही केला.
हे देखील वाचा – ‘रात जवां है’मधील भूमिकेतून अभिनेत्री अंजली आनंद काय शिकली ? स्वत: शेअर केला अनुभव