(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी संगीतविश्वातील राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र आता एका नव्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला आली आहे. तिच्या मधुर आणि भावपूर्ण आवाजामुळे सावनीने संगीतप्रेमींच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
आता ती स्वतःचं म्युझिक लेबल सुरू करत आहे, ज्याचं नाव ‘सावनी रेकॉर्डझ्’ आहे. नुकत्याच पार पडलेल्या लाँच कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. या सोहळ्यात दिग्गज गायक सुरेश वाडकर यांनी लेबलचे लाँच केले. संगीतविश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते, जसे की अवधूत गुप्ते, अभिजीत सावंत, कौशल इनामदार, अविनाश-विश्वजीत, नंदेश उमप, ऋषिकेश कामेरकर, मंगेश बोरगावकर, निहार शेंबेकर आणि लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे.
या लेबलखाली सावनीचं पहिले गाणं ‘मुजरा शिवबाला’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाणं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन म्हणून सादर करण्यात आलं आहे. गीतलेखन वैभव देशमुख यांनी केलं असून संगीत विजय नारायण गवंडे यांचे आहे. सावनीच्या गायनासह या गाण्यात लावणीही सादर केली गेली, ज्यामुळे लावणी प्रेमींनाही खूप आवडलं आणि त्यांचा सन्मानही करण्यात आला.
आजपर्यंत सावनीने संगीतामध्ये सातत्याने निरनिराळे प्रयोग केले आहेत. ‘सावनी ओरिजिनल्स’ या तिच्या यूट्यूबवरील सिरीजअंतर्गत तिने विविध भाषांमध्येही गायन केले आहे. चित्रपटांच्या गाण्यांबरोबरच ती तिच्या संगीतिक प्रयोगांसाठीही ओळखली जाते.
या नव्या उपक्रमाबद्दल सावनी म्हणते, ”सर्व अडचणींवर मात करत कुटुंब आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आहे. संगीत हेच माझं बळ आहे आणि त्याच बळावर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘सावनी रेकॉर्डझ्’ हे केवळ म्युझिक लेबल नसून ते माझं स्वप्न आहे. एक असं व्यासपीठ जिथे दर्जेदार, अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारे संगीत साकारेल. जिथे पोहोचण्याचा विचारही अनेकांसाठी धाडसी वाटतो, त्या वाटेवर चालण्याची हिंमत मी केली आहे. कलेच्या प्रेमापोटी सावनी रेकॉर्ड ही मोठी पायरी मी चढते आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छिते की माझी गाणी अर्थातच या लेबलवर प्रदर्शित होतील त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित गायकांची व नवीन काही करू पाहाणाऱ्यांची गाणी प्रभावीपणे पोहोचवता येतील. पुढच्या काळात नव्या कलाकारांना संधी देत, संगीताच्या माध्यमातून काहीतरी वेगळं आणि अभिमानास्पद घडवण्याचा माझा प्रयत्न असेल.”
सुरेश वाडकर म्हणतात, “सावनीने तिच्या ‘मुजरा शिवबाला’ या गाण्यातून खरंच आपल्याला जुन्या काळात नेलं. पूर्वी ज्या ताकदीने आणि ठसक्यात लावण्या सादर केल्या जायच्या, तोच अनुभव या गाण्यातून मिळतो. सावनीने लावणीची परंपरा अत्यंत सुंदरपणे जपली आहे. गाण्याची चाल, शब्द आणि एकूणच सादरीकरण खूपच प्रभावी आहे. विशेष म्हणजे तिने स्वतः गायन करतानाच या गाण्यात उत्कृष्ट परफॉर्मन्सही दिला आहे, त्यामुळे स्क्रीनवर तिचं काम खूप सहज आणि उठून दिसतं. सावनीला संगीताचा उत्तम वारसा लाभला आहे. तिच्या या नव्या म्युझिक लेबलसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो.”
‘सावनी रेकॉर्डझ्’चा लोगोही तितकाच अर्थपूर्ण आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या ओळखीचं प्रतीक असलेल्या ‘चंद्रकोर’ आणि व्हिनाइल रेकॉर्ड डिस्क यांचा सुंदर संगम या लोगोमध्ये पाहायला मिळतो. हा लोगो केवळ डिझाइन नसून जिंकण्याची वृत्ती, संगीताची परंपरा आणि भविष्यकालीन दर्जेदार कामाची हमी दर्शवतो. मराठी स्त्री गायिकांमध्ये स्वतःचे म्युझिक लेबल सुरू करून त्याअंतर्गत गाणी प्रदर्शित करण्याचं धाडस फार कमी जणी करताना दिसतात. अशा परिस्थितीत सावनी रवींद्रने घेतलेलं हे पाऊल अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.






