मिका सिंगची शाहरुख विरोधात तक्रार, मागितलेली भेटवस्तू न दिल्याने नाराज
सध्या प्रसिद्ध बॉलिवूड गायक मिका सिंग कमालीचा चर्चेत आला आहे. कायमच आपल्या गाण्यामुळे चर्चेत राहणारा गायक सध्या त्याच्या विधानामुळे चर्चेत आला आहे. गायकाने नुकतंच पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. त्याने अनेक बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांचे खरे चेहरे समोर आणले आहेत. गायक मिका सिंगने शाहरुख खानने दिलेले वचन पूर्ण केले नसल्याचे वक्तव्य केले आहे. गायकाने केलेल्या विधानाचे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते.
मिका सिंगने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत काही वर्षांपूर्वी हृतिक रोशनच्या वाढदिवसाच्या पार्टीची आठवण सांगितली. त्याने म्हटले, “शाहरुखने नुकतीच रोल्स रॉयस गाडी विकत घेतली होती आणि आम्ही सगळ्यांनी त्या गाडीतून फिरायला जावे असे त्याला वाटत होतं. पण, मी आग्रह केला की अशा गाडीतून जाऊ, ज्यामध्ये सगळ्यांना बसण्यासाठी जागा मिळेल. पहाटीचे पाच वाजले होते आणि मी माझ्याकडे असलेली हमर गाडी घेण्याचे सुचवले होते. त्यावेळी रणवीर सिंग, गौरी, संजय कपूर, त्यांची पत्नी महदीप सुद्धा आमच्यासोबत आले होते.”
श्रद्धा कपूरने कन्फर्म केलं नातं? मोबाईलच्या वॉलपेपरवर दिसला रूमर्ड बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो
“पण, त्यानंतर कारमध्ये जागेची समस्या निर्माण झाली. कोण गाडी चालवणार हा प्रश्न पडला. जर ड्रायव्हरला नेले असते तर जागेची समस्या निर्माण झाली असती, त्यामुळे मी शाहरुखला गाडी चालवण्याची विनंती केली. तो इतका चांगला आहे, त्याने गाडी चालवण्याचे मान्य केले.” पुढे मिका सिंगने सांगितले की, “त्या रात्री मी शाहरुख खान, रणवीर सिंग आणि हृतिक रोशन यांच्याबरोबर फोटो काढला. मी शाहरुखसाठी जास्त गाणी गायली नाहीत. मात्र, त्याने ज्याप्रकारे मला वागणूक दिली, त्यावरून मला वाटलं की तो फार मोठ्या मनाचा आहे. मी त्याच्यासाठी ‘रईस’ आणि ‘हॅपी न्यू इअर’चित्रपटातीलच काही गाणी गायली आहेत. माझ्या घरातील पीएस ५ देखील त्याच्याकडून मिळालेली भेट आहे, असे म्हणत त्याने शाहरुख खानचे कौतुक केले.
जेव्हा शाहरुख खानविरुद्ध तक्रार करायची वेळ आली तेव्हा मिका सिंग म्हणाला की, “जरी त्याने मला अनेक भेटवस्तू दिल्या असल्या तरीही त्याने मला एकदा एक बाईक भेट देण्याचे वचन दिले होते. त्याने अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांना बाईक भेट देताना मला हे वचन दिले होते. जर बाईक नसेल तर मला सायकल भेट द्या, मला त्याचाही आनंद होईल.” असं म्हणत कमीत कमी शाहरुखने मला सायकल गिफ्ट द्यावी, असं मिका सिंग म्हटला आहे. मुलाखतीत पुढे गायक म्हणाला की, “मी ५० लाख किमतीच्या अंगठ्या अमिताभ बच्चन आणि गुरूदास मान यांना दिल्या आहेत. पण, सर्वात आधी मी शाहरुख खानला अंगठी गिफ्ट म्हणून दिलेली आहे. मला पहिल्यापासूनच त्या तीनही लोकांसाठी काहीतरी खास करायचं होतं.”