ameya khopkar warning
सिनेमागृह-मल्टिप्लेक्सवर हिंदी सिनेमांच्या तुलनेत मराठी चित्रपटांना नेहमीच दुय्यम स्थान मिळतं. आज मराठी चित्रपट बॉलिवूडला चांगली टक्कर देत आहेत. हिंदीच्या तुलनेत मराठी सिनेमांचं निर्मितीमूल्य आणि जाहिरातबाजी कमी असली, तरी गेला महिनाभर मराठी सिनेमे (Marathi Movie) चित्रपटगृहांत चांगली कामगिरी करीत आहेत. ‘वेड’, ‘वाळवी’,‘सरला एक कोटी’, ‘व्हिक्टोरिया’ बॉक्स ऑफिसवर सरस ठरले. दरम्यान आज शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्याचा मराठी चित्रपटांच्या शोवर परिणाम होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी थिएटर मालकांना इशारा दिला आहे. ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटामुळे जर मराठी चित्रपटाचे शो थिएटर मालक रद्द करत असतील तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. ज्या मराठी चित्रपटांचे शो ‘पठाण’मुळे रद्द करण्यात आले आहेत ते पुन्हा लावले जावेत नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल, असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.
[read_also content=”कंगनाची ट्वीटर वापसी, तब्बल 20 महिन्यांनंतर ट्वीटद्वारे केली महत्त्वाची घोषणा,म्हणाली… https://www.navarashtra.com/movies/kangana-ranaut-back-on-twitter-first-tweet-viral-nrsr-364357.html”]
4 वर्षांनी शाहरुखचं कमबॅक
या सिनेमातून शाहरुख 4 वर्षांनी कमबॅक करत असल्याने या सिनेमाची हवा अधिक आहे. याचा परिमाण मराठी सिनेमांवर होत आहे. गेला महिनाभर ‘वेड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत आहे. तर परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ हा चित्रपट माऊथ पब्लिसिटी आणि अनोख्या कथानकामुळे प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे येण्यास भाग पाडत आहे. ‘वेड’ने मराठीमध्ये रोमँटिक सिनेमा दिला, तर ‘वाळवी’च्या माध्यमातून मराठीमध्ये डार्क कॉमेडीची जादू अनुभवता आली. आगामी काळात मात्र या सिनेमांचे शो रद्द होत असल्याने निर्मात्यांचे नुकसान होऊ शकते.
‘पठाण’ला जास्त स्क्रिन्स देण्याचा प्रयत्न
‘पठाण’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. अनेक चित्रपटगृहांत ‘वेड’ आणि ‘वाळवी’ सिनेमांचे शो २५ जानेवारीपर्यंत पूर्वनियोजित आहेत; पण त्यानंतरच्या दिवसांमध्ये शोचं प्रमाण कमी झालेलं आहे. बॉलिवूडचे सिनेवितरक बहुतांश स्क्रीन्स ‘पठाण’ला मिळवून देण्याच्या प्रयत्नांत असल्याचं कळतंय. मराठी प्रेक्षक आता मराठी सिनेमांना जास्त गर्दी करत आहेत. मात्र ‘पठाण’ मुळे हे गणित बदलत आहे. त्यामुळेच मनसे मराठी चित्रपटांच्या पाठिशी उभी राहिली आहे.