Nitesh Pandey Death : मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेते अशी ओळख असलेले नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचं निधन झालं आहे. अनुपमा (Anupama serial ) मालिकेत रुपाली गांगुली (Rupali Ganguli) हिच्या मैत्रिणीच्या पतीची भूमिका नितेश पांडे यांनी साकारली होती.
नितेश यांचं निधन हार्ट अटॅकने झाल्याची माहिती आहे.
नितेश पांडे यांच्या आकस्मिक निधानाने त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. लेखक सिद्धार्थ नागर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नितेश यांच्या निधनाबद्दल माहिती दिलेली आहे, “हे खरं आहे, मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्या कार्यक्रमाहून परतत असताना मला नितेश यांच्या निधनाबद्दल समजलं.
नितेश शूटिंगसाठी मुंबईबाहेर गेले होते. तिथेच त्यांना रात्री 1.30 च्या सुमारास अटॅक आला.” असं सिद्धार्थ नागर यांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, टीव्ही अभिनेते नितेश पांडे यांचा मृतदेह नाशिकच्या इगतपुरी हॉटेलमध्ये सापडला आहे, ते इगतपुरीतील ड्यू ड्रॉप हॉटेलमध्ये थांबले होते. जवळच्या लोकांच्या म्हणण्यानुसार ते नेहमी इगतपुरीला कथा लिहायला येत असल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरा त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस हॉटेलवर पोहोचले होते. नाशिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
सध्या नितेश अनुपमा मालिकेत अनुपमाच्या मैत्रिणीच्या नवऱ्याची भूमिका साकारत होते. नितेश पांडे यांचा जन्म 17 जानेवारी 1973 साली झाला. मालिका आणि चित्रपटांमध्ये ते गेली अनेक वर्ष काम करत आहेत. टीव्हीवरील एक लोकप्रिय चेहरा अशी त्यांची ओळख आहे. शाहरुख खानच्या ‘ओम शांति ओम’ सिनेमातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ते शाहरुखच्या असिस्टंटच्या भूमिकेत होते. तसंच दिशा परमार आणि नकुल मेहता यांच्या ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार’ या गाजलेल्या मालिकेतूनही ते महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
‘तेजस’, ‘साया’, ‘मंजिलें अपनी अपनी’, ‘जुस्तजू’, ‘हम लड़कियां’, ‘सुनैना’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, ‘महाराजा की जय हो’, ‘हीरो-गायब मोड ऑन’ या मालिकांमध्ये नितेश पांडे यांनी काम केलं होतं. तसंच सध्या ते ‘अनुपमा’ मालिकेत धीरज कपूर या भूमिकेत दिसत होते. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत होती.