'पिंजरा' फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन
Sandhya Shantaram passed away News in Marathi : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अद्भुत अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी शोककळा पसरली. संध्या या सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ट्विट करून ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाची माहिती शेअर केली. त्यांनी लिहिले, भावपूर्ण श्रद्धांजली! प्रसिद्ध पिंजरा चित्रपट अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी खूप दुःखद आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांच्या अद्भुत अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांवर एक अनोखी छाप सोडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखे बारह हाथ’ आणि विशेषतः ‘पिंजरा’ या चित्रपटांमधील त्यांच्या अद्भुत भूमिका प्रेक्षकांना मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो!
भावपूर्ण श्रद्धांजली ! ‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह… pic.twitter.com/Gsdq5KuXP9 — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 4, 2025
अभिनेत्री संध्या शांताराम या झनक झनक पायल बाजे, नवरंग या आणि अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. टपोरे डोळे आणि चेहऱ्यावरचे हावभाव यातून बोलणाऱ्या संध्या यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनात त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. अरे जा हरे नटखट या गाण्यात त्यांनी पुरुष आणि स्त्री अशी वेशभुषा करूनच नाच करत सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं होतं. अशा हरहुन्नरी अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली आहे.
संध्या शांताराम यांचे खरे नाव विजया देशमुख होते. ‘अरे जा रे हट नटखट’, या गाण्यासाठी त्या विशेषतः शास्त्रीय नृत्य शिकल्या. दिग्दर्शकाला हे गाणे खरोखरच खास बनवायचे होते, म्हणून त्यांनी खऱ्या हत्ती आणि घोड्यांची व्यवस्था केली. सेटवर खऱ्या प्राण्यांमध्ये संध्या निर्भयपणे नाचत होत्या. अभिनेत्री संध्यांना माहित होते की हे सोपे नाही, कारण प्राणी आवाज आणि माणसांमुळे अस्वस्थ होऊ शकतात. पण त्या घाबरल्या नाही; त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी बॉडी डबलही वापरला नाही. गाण्याच्या शूटिंगपूर्वी, त्यांनी हत्ती आणि घोड्यांशी मैत्री केली, त्यांना स्वतःच्या हातांनी केळी आणि नारळ खायला दिले आणि पाणी पाजले. संध्याच्या समर्पणाने आणि धाडसाने दिग्दर्शक प्रभावित झाले.