फोटो सौजन्य - Social Media
१९५० आणि १९६० च्या दशकातील एक अत्यंत यशस्वी व प्रतिष्ठित अमेरिकन गायिका कोनी फ्रान्सिस यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची दु:खद बातमी त्यांच्या जवळच्या मित्राने आणि कॉन्सेटा रेकॉर्ड्सचे अध्यक्ष रॉन रॉबर्ट्स यांनी १६ जुलै रोजी फेसबुक पोस्टद्वारे दिली. काही काळापासून त्या आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होत्या आणि अलीकडेच त्यांना तीव्र वेदना जाणवल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या निधनामागील नेमका कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
रॉन रॉबर्ट्स यांनी अधिकृत निवेदनात म्हटले की, “माझी प्रिय मैत्रीण कोनी फ्रान्सिस आपल्यात नाही, ही बातमी अत्यंत दुःखाने मी शेअर करत आहे. कोनीच्या चाहत्यांना हे सर्वप्रथम कळावे, अशी तिची इच्छा असती.” काही दिवसांपूर्वी कोनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते की, पूर्वीच्या हिप ट्रीटमेंटनंतर त्यांना वेदना होत असून त्या वैद्यकीय चाचण्या करत आहेत.
कोनी फ्रान्सिस यांनी १९५५ मध्ये एमजीएम रेकॉर्ड्ससोबत करिअरची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, पण १९५८ मध्ये आलेल्या “Who’s Sorry Now?” या गाण्याने त्यांना अचानक प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. त्यानंतर ‘Stupid Cupid’, ‘Lipstick On Your Collar’, ‘Where the Boys Are’, आणि ‘Pretty Little Baby’ यांसारख्या गाण्यांनी त्या पॉप म्युझिकच्या जगतात ग्लोबल स्टार बनल्या.
कोनी फ्रान्सिस या बिलबोर्ड हॉट 100 चार्टवर अव्वल स्थान मिळवणाऱ्या पहिल्या एकल महिला गायिका ठरल्या होत्या. त्यांच्या गाण्यांमध्ये असलेली भावनिक खोली आणि ऊर्जेने त्यांनी संपूर्ण जगभरातील चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. त्यांचे गाणे ‘प्रिटी लिटिल बेबी’ अलीकडील वर्षांमध्ये टिकटॉक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाले आणि नव्या पिढीच्या हृदयात त्यांना पुन्हा स्थान मिळाले. हे त्यांच्या कलात्मकतेचे आणि लोकप्रियतेचे जिवंत उदाहरण आहे. कोनी फ्रान्सिस यांचं संगीत आणि वारसा संगीतप्रेमींच्या मनात सदैव जिवंत राहील.