फोटो सौजन्य - Social Media
भारतीय ज्ञान परंपरेतील (Indian Knowledge System) करिअर संधींचा मागोवा घेण्यासाठी पुण्यात एक विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे. भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिम आणि भरत नाट्य संशोधन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र शनिवारी, १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९:४५ ते १०:४५ या वेळेत भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. या चर्चासत्रासाठी प्रवेश मोफत असून सर्व वयोगटासाठी खुले आहे.
या चर्चासत्रामध्ये इंडियन नॉलेज सिस्टिम म्हणजेच आय.के.एस. मधील करिअर संधी, त्यामागचे तत्त्वज्ञान, शालेय आणि उच्च शिक्षणातील उपयोग, तसेच याचे व्यावसायिक महत्त्व यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या चर्चासत्रात प्रा. क्षितिज पाटुकले, विवेक वेलणकर, प्रदीप रावत, अभिजित जोग, रवींद्र खरे आणि अभय जबडे हे मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या मते, प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती, गुरुकुल, वेद-उपनिषद यामधून घडणारे विद्यार्थी हे राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत होते. मात्र आज पाश्चिमात्य शिक्षणामुळे समाज मूल्यहीन, अस्थिर आणि विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशावेळी IKS हीच सकारात्मक पर्याय ठरू शकते, असे मत अनेक अभ्यासकांनी मांडले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) नुसार IKS आता शाळा, महाविद्यालय, संशोधन संस्था, मीडिया, पर्यटन, लेखन, कॉर्पोरेट ट्रेनिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय होत आहे. मात्र या क्षेत्रात प्रशिक्षित IKS तज्ञांची कमतरता आहे. यासाठीच या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, यामधून शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, संशोधन, परदेशातील करिअर संधी, मीडिया, पर्यटन आदी क्षेत्रांतील संधींवर विचारमंथन होणार आहे. अनेक तद्न्य मंडळी त्यांचे विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकट करणार आहेत.
या कार्यक्रमामुळे आय.के.एस.मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि मार्गदर्शकांना स्पष्ट दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. अधिक माहितीसाठी भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिमच्या 7875743405 किंवा 7875191270 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.