
फोटो सौजन्य - Social Media
दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटात कृष्णा (आर्यन मेंगजी), प्रसाद (श्रेयस थोरात) आणि सिद्धेश (मंथन काणेकर) हे तिघे मित्र आधीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांच्यातील गटगट्टी, धमाल, मस्ती गाण्यांमधून आणि टीझरमधून झळकली. मात्र या त्रिकुटाच्या कथेत सतत दिसणारा एक पाठमोरा चेहरा प्रेक्षकांना गोंधळात टाकत होता. अखेर आता त्या रहस्याचा उलगडा झाला असून, तो चेहरा आहे ‘जाई’चा! जाई म्हणजे कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशची मैत्रीण.
जाईची भूमिका साकारतेय अभिनेत्री साजिरी जोशी, जी प्रसिद्ध अभिनेत्री ऋजुता देशमुख यांची मुलगी आहे. अभिनयाचा वारसा लाभलेल्या साजिरीचं ‘एप्रिल मे ९९’ मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण होत आहे. तिची व्यक्तिरेखा समजूतदार, गोड, हुशार आणि दिलखुलास अशा स्वभावाची असून ती या तीन मित्रांसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीत धमाल करताना दिसणार आहे.
दिग्दर्शक रोहन मापुस्कर सांगतात, “पूर्वी एका चित्रपटासाठी साजिरीची ऑडिशन घेतली होती, पण ती भूमिका तिच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळत नव्हती. मात्र तिचे बोलके डोळे, कुरळे केस आणि निरागस हावभाव लक्षात राहिले. त्यामुळे ‘एप्रिल मे ९९’ लिहिताना जाईची व्यक्तिरेखा साजिरीला डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिली. तिच्या अभिनयातील सहजता आणि नैसर्गिकता प्रेक्षकांना निश्चित भावेल.”
निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “एप्रिल मे ९९ हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाला त्यांच्या बालपणात घेऊन जाणारा अनुभव आहे. त्यासाठी पात्रांमध्ये तीच निरागसता आणि खट्याळपणा हवा होता. आर्यन, श्रेयस, मंथन आणि साजिरी ही पात्रं त्यासाठी अगदी योग्य आहेत. साजिरीचं गोड हास्य आणि अभिनय चित्रपटात टवटवीतपणा आणतो.”
‘मापुस्कर ब्रदर्स’ यांच्या सहनिर्मितीत फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ चे लेखन व दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केलं आहे. राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी, मॉरिस नून हे चित्रपटाचे निर्माते असून लॉरेन्स डिसोझा सहनिर्माते आहेत. हा चित्रपट येत्या १६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून यंदाची उन्हाळ्याची सुट्टी ‘एप्रिल मे ९९’मुळे अविस्मरणीय ठरणार आहे.