
सौजन्य- इंस्टाग्राम
मुंज्या चित्रपट : मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा पार केला आहे. 30 कोटींमध्ये निर्मिती झालेल्या मुंज्याने प्रंचड यश या कामगिरीतून मिळविले आहे. ४ थ्या आठवड्यातही या चित्रपटाने जोरदार कमाई सुरु ठेवली आहे. हॉररसोबतच कॉमेडी असलेल्या या चित्रपटातील शर्वरी वाघचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. एक व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीने मुन्नी ते मुंज्यापर्यंतच्या तिच्या प्रवासाची झलक दाखवली आहे.
शर्वरी वाघ ची चित्रपटातील व्यक्तिरेखा असलेली मुन्नी भूताच्या ताब्यात येते. जेव्हा हे घडते तेव्हा प्रेक्षकांना तिची भितीदायक बाजू पहायला मिळते. आता शर्वरीने भूत बनण्यासाठी किती मेहनत करावी लागली याचा खुलासा केला आहे. मेकअपचा व्हिडिओ शेअर करताना तिने त्यासाठी केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली आहे.
५ तास केला मेकअप
या व्हिडिओमध्ये शर्वरीने मेकअप रूमची झलक दिली, जिथे ती शर्वरीपासून मुंज्यामध्ये बदलते आहे. म्हणजेच तिच्या चेहऱ्याला एक भूताचा लूक देण्यासाठी मेकअप केला जातो. या प्रक्रियेबाबत शर्वरी म्हणाली की, तिला मुंज्या भूत होण्यासाठी पाच तास लागले. शूटिंग संपल्यानंतर हा मेकअप काढण्यासाठी दीड तास लागला.
देहबोलीसाठी केला सराव
शर्वरीने सांगितले की, चित्रपटात दाखवलेला मुंज्या हा खरा नसून संगणकाने तयार केलेली ती प्रतिमा आहे. तेच भूत जेव्हा तिच्यावर ताबा घेते तेव्हा तीही मुंज्या बनते. भूताच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तिने तिच्या देहबोलीवर खूप मेहनत घेतली. शर्वरी तिच्या टीमसोबत वेगवेगळ्या ठिकाणी जायची आणि व्हिडिओ बनवायची जेणेकरून तिला एका प्रकारच्या देहबोलीवर लक्ष केंद्रित करता येईल.
मुंज्याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले असून मुंज्यामध्ये शर्वरी वाघ सोबत अभय वर्मा, सत्यराज, मोना सिंग, सुहास जोशी हे प्रमुख भूमिकेत आहेत.