मुंबई : दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात अभिनेता प्रभास (Actor Prabhas) भगवान रामाच्या (Lord Rama) भूमिकेत आहे. तर क्रिती सेनॉन (Kriti Senon) माता जानकीच्या भूमिकेत आहे. सैफ अली खान चित्रपटात लंकेश (रावण) च्या भूमिकेत दिसत आहे तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे.
आत्तापर्यंत रामायणावर आधारित 50 चित्रपट आणि 18 टीव्ही शो बनवण्यात आले आहेत. ज्यामध्ये हिंदीत 17 आणि तेलुगू भाषेतील 18 चित्रपटांचा समावेश आहे. ज्यामध्ये अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाईही केली. भारतात 106 वर्षांपूर्वी पौराणिक चित्रपट बनवण्याचा ट्रेंड होता. 1917 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत रामायणावर बनलेला पहिला चित्रपट ‘लंका दहन’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन दादासाहेब फाळके यांनी केले होते.
या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे या चित्रपटात राम आणि सीतेची भूमिका एकाच अभिनेता अण्णा साळुंकेने साकारली होती. या चित्रपटाशिवाय रामायणावर आधारित ‘रामायण’, ‘राम राज्य’, ‘संपूर्ण रामायण’, ‘भारत मिलाप’, ‘बजरंगबली’ आणि ‘राम बान’ या चित्रपटांचा समावेश आहे.
रामायणावर आधारित आगामी चित्रपट
रामायणावर आधारित आगामी चित्रपटांपैकी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचा ‘सीता-द इनकारनेशन’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. आलौकिक देसाई दिग्दर्शित या आगामी चित्रपटात कंगना राणावत सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण ट्रायलॉजी’ या चित्रपटात हृतिक रोशन रामच्या भूमिकेत तर दीपिका पदुकोण सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
जपानमध्येही बनलाय चित्रपट
रामायणावर आधारित हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जपानमध्येही बनवण्यात आला आहे. ‘रामायण: द लीजेंड ऑफ प्रिन्स राम’ नावाचा अॅनिमेटेड चित्रपट होता. या चित्रपटाला जपानमध्येही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात आहे.