फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये नवाबी खानदानीमध्ये सैफ अली खानचा आणि त्याच्या फॅमिलीचा समावेश होतो. सैफ अली खानची आणि त्याची फॅमिलीचं पतौडी पॅलेस खूप सुंदर आहे. हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यात सैफ आणि करीनाचं हे ‘पतौडी पॅलेस’ आहे. काही एकरमध्ये, पसरलेल्या ह्या पॅलेसमध्ये तब्बल १५० खोल्या असून याची किंमत ८०० कोटींइतकी आहे. ह्या पॅलेसबद्दल बरीच माहिती अभिनेता सैफ अली खानची बहिण सोहा अली खान हिने एका मुलाखतीतून दिली आहे. नुकतंच सोहाने सायरस ब्रोचाला मुलाखत दिली.
हाऊसिंग डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर सायरस ब्रोचासोबत सोहाने संवाद साधला. यावेळी तिने मुलाखतीमध्ये, त्यांच्या नवाबी खानदानाचं असलेल्या ‘पतौडी पॅलेस’बद्दल अनेक खुलासे केले आहेत. दिलेल्या मुलाखतीमध्ये सोहाने सांगितलं की, “माझी आई (शर्मिला टागोर) ‘पतौडी पॅलेस’च्या सर्व खर्चांचा हिशेब ठेवते. ती दररोज पॅलेसमध्ये किती खर्च होतो? शिवाय महिन्याला एकूण किती खर्च होतो ? एकंदरीत सर्व या गोष्टींचा ती लेखाजोखा ठेवते. आम्ही पतौडी पॅलेसला रंग मारत नाही तर चुना लावतो. रंग लावला तर तो खूप खर्चिक होईल म्हणून आम्ही कमी खर्चात ‘पतौडी पॅलेस’ला चुना लावतो. आम्ही या पॅलेससाठी अनेक वर्षांपासून एकही नवीन वस्तू खरेदी केलेली नाही.”
पुढे दिलेल्या मुलाखतीमध्ये सोहाने सांगितले की, “माझा भाऊ सैफचा जन्म १९७० मध्ये झाला होता. तो जन्मताना राजकुमार म्हणून जन्मला होता. त्यामुळे हे पॅलेस त्याच्या नावावर आहे. तो ‘पतौडी पॅलेस’चा मालक आहे. आम्ही ह्या पॅलेसचा वापर आम्हाला जेव्हा सुट्ट्या असतात त्यावेळेच करतो. बाकी दिवस आम्ही त्याला चित्रपटाच्या शुटिंगसाठी भाडे तत्वावर देतो.” मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने सांगितले की, हा ‘पतौडी पॅलेस’ तिच्या आजोबांचा आहे. माझी आजी भोपाळची बेगम होती आणि माझे आजोबा पतौडीचे नवाब होते. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं, पण आजोबा तिच्याशी लग्न करू शकत नव्हते. आजीच्या वडीलांना लग्नासाठी प्रभावित करण्यासाठी माझ्या आजोबांनी हा पतौडी पॅलेस बांधला होता.
‘पतौडी पॅलेस’ बांधताना माझ्या आजोबांचे पैसे संपले होते. त्यामुळे तुम्ही जर कधी पतौडी पॅलेसमध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल की तिथे खूप सारे गालिचे आंथरले आहेत. संगमरवर आणायला पैसे नसल्यामुळे माझ्या आजोबांनी सिमेंटचं बांधकाम तसंच ठेवलं आणि त्यावर गालिचे आंथरले. या पॅलेसमधील ‘जनरेटर रूम’ तिच्या मालकीची आहे, त्या रुमची देखभाल तिला स्वत:ला करावी लागते. ‘जनरेटर रूम’ टू बीएचके आहे, असं अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये सांगितलं.