"कॉलर पकडली आणि धमकी दिली…"; दिलीप जोशी यांचं ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांशी झालं कडाक्याचं भांडण
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिका गेल्या १६ वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करतेय. मालिका तर लोकप्रिय आहेच पण मालिकेत भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फालोइंग बघायला मिळते. मालिकेत जेठालालचे (Jethalal) पात्र साकारणारे दिलीप जोशी कायमच चर्चेत असतात. दिलीप जोशी यांचा चाहता वर्ग मोठा आहे. न्यूज १८ च्या शोशाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘तारक मेहता…’च्या सेटवर जेठालाल अर्थात दिलीप जोशी आणि निर्माते असित कुमार यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आहे.
हे देखील वाचा- अभिनेत्री विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’ चित्रपटाला ७ वर्ष पूर्ण!
दोन दिवसांच्या रजेवरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यांच्यातील वाद इतक्या टोकाला पोहोचला की शोच्या सेटवरच दिलीप जोशी यांनी निर्माते असितकुमार मोदी यांची कॉलर पकडली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या समोर आलेल्या काही बातम्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. न्यूज १८ च्या शोशाने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात ऑगस्ट महिन्यात हे कडाक्याचे भांडण झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी निर्माते असितकुमार मोदींकडे दोन दिवसांची सुट्टी मागण्यासाठी गेले होते, मात्र निर्माते अभिनेत्याशी बोलणं टाळत होते. याचे दिलीप जोशी यांना वाईट वाटले आणि त्यांच्यातील वाद विकोपाला गेला.
रिपोर्टमध्ये सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोली म्हणजेच कुश शाहच्या शुटिंगचा शेवटचा दिवस होता. दिलीप जोशी काही दिवसांच्या सुट्ट्यांची परवानगी घेण्यासाठी निर्माते असित कुमार यांच्या येण्याची वाट पाहत होते. पण असित कुमार आल्या आल्या थेट कुशलाच भेटायला गेले. यामुळे दिलीप जोशी यांना अपमानास्पद वाटलं. दिलीप जोशी यांना असित कुमार यांची वागणूक पाहून चांगलाच राग आला होता. त्या रागाचे रुपांतर पुढे वादामध्ये झाले. दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. दिलीप यांनी रागाच्या भरात निर्माते असित मोदींची कॉलर पकडली आणि शो सोडण्याची धमकी दिली. त्यानंतर असित कुमार यांनी दिलीप जोशींचा राग शांत करून त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला.
हे देखील वाचा- प्रदर्शनापूर्वीच श्रुती मराठेच्या ‘गुलाबी’चित्रपटाने केली कोट्यवधींची कमाई…
रिपोर्टमध्ये सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी आणि असित मोदी यांचे यापूर्वीही अनेकदा वाद झाले आहेत. हाँगकाँगमध्ये शुटिंग सुरू असतानाही दिलीप जोशी आणि असित मोदींमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. तेव्हा गुरूचरण सिंह सोढीने मध्यस्थी करत त्यांचे भांडण सोडवले होते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेतील अनेक कलाकारांनी शोला रामराम ठोकला आहे. दिशा वकानी, भव्य गांधी, गुरुचरण सिंग सोढी, शैलेश लोढा, जेनिफर मिस्त्री, नेहा मेहता, कुश शाह यांनी मालिका सोडली. यापैकी काही कलाकारांची जागा आता नवीन कलाकारांनी घेतली आहे. तर, दिशा वकानी अर्थात दया भाभीची रिप्लेसमेंट अजूनही निर्मात्यांनी शोधलेली नाही.