प्रदर्शनापूर्वीच श्रुती मराठेच्या ‘गुलाबी’चित्रपटाने केली कोट्यवधींची कमाई...
मराठी चित्रपटसृष्टीत ‘गुलाबी’ चित्रपटाने नवा इतिहास रचला आहे. २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शानपूर्वीच एक कोटींचा गल्ला जमवला आहे. असा विक्रम साधणारा ‘गुलाबी’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. बुकिंग सुरू होताच महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी तिकिटे आरक्षित केली आहेत. या चित्रपटाचे प्री-बुकिंग अवघ्या एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
गुलाबी नगरी, जयपूरच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या तीन स्त्रियांच्या मैत्रीचा हा प्रवास प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा ठरणार आहे. तीन मैत्रिणींच्या मैत्रीचा प्रवास आणि त्यांच्या स्वप्नांची सफर आपल्याला चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. एकत्र आलेल्या या तीन मैत्रिणी कशा आपल्या आयुष्यातील संघर्षांना सामोरे जातात आणि मैत्रीतून जगण्याची एक वेगळी दिशा शोधतात, याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.
दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “पूर्वप्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचा हा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूप मोठा आहे. प्रेक्षकांचा हा पाठिंबा ‘गुलाबी’ चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही या प्रवासाचा आनंद घेत आहोत. ‘गुलाबी’ चित्रपटात मैत्री आणि स्वप्नांचा एक सुंदर प्रवास दाखवला आहे. लोकांच्या हृदयात ‘गुलाबी’ने आधीच स्थान मिळवले आहे याचा खूप आनंद होतो. प्रेक्षकांना चित्रपट नक्की आवडेल याची खात्री आहे.’’
व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत, अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे निर्माते आहेत. यात चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार, आणि निखिल आर्या यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर अमोल भगत या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत.