निक शिंदे आणि अनुश्री मानेची जोडी असलेले रोमॅंटिक गाणं 'पदर' रिलीज
सध्या सोशल मीडियावर मराठी गाणी कित्येकवेळा ट्रेंड होताना दिसतात. विशेष म्हणजे ही गाणी फक्त मराठी प्रेक्षकच नव्हे तर अमराठी प्रेक्षक सुद्धा डोक्यावर घेत आहे. अशावेळी मराठी गाणी बनवणाऱ्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढत आहे. तसेच इंस्टाग्राम रील्समुळे सुद्धा या गाण्यांना चांगली लोकप्रियता मिळत आहे.
सध्या प्रेक्षकांमध्ये रोमँटिक गाण्यांचा ट्रेंड असल्याचे पाहायला मिळतेय. एकामागोमाग एक प्रेमाच्या परिभाषेवर आलेली गाणी साऱ्या प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवत आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हल्ली रील्समुळे सुद्धा रोमँटिक गाणी ट्रेंड होताना दिसत आहे, मग ते बहराला मधूमास असो की नखरेवाली गाणं.
मराठी प्रेक्षकांनी सुद्धा या गाण्यांना उदंड प्रतिसाद दिला आहे.
याच रोमँटिक गाण्यांच्या यादीत एका मराठमोळ्या गाण्याची भर पडली असून हे गाणं साऱ्यांना थिरकायला भाग पाडत आहे. प्रशांत नाकती यांचे ‘पदर’ हे मराठमोळं गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेता निक शिंदे आणि अभिनेत्री अनुश्री माने या जोडीचा रोमँटिक अंदाज या गाण्यातून साऱ्यांच्या मनाचा ठाव घेत आहे.
प्रत्यक्षात पाहिलेल्या एका नखरेल मुलीला थेट स्वप्नांत आपली प्रेयसी करण्यापर्यंतचा प्रियकराचा क्युट असा प्रवास या गाण्यातून पाहायला मिळतोय. इतकंच नव्हे तर स्वप्न पडून गेल्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा ती मुलगी समोर येते तेव्हा त्या प्रियकराची होणारी घालमेल या गाण्यात पाहणं रंजक ठरणार आहे.
हे देखील वाचा: शरद केळकरच्या ‘रानटी’मध्ये दिसणार ॲक्शन ड्रामा, चित्रपटाचा दमदार टिझर झाला रिलीज!
प्रशांत नाकतीच्या या ‘पदर’ गाण्याच्या निर्मितीची धुरा ‘एरीक’ आणि ‘विण्मयी म्युझिक’ यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर या रोमँटिक गाण्यात निक शिंदे आणि अनुश्री माने यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नाकती यांनी पेलवली आहे. तर संगीत दिग्दर्शक म्हणूनही प्रशांत नाकती आणि संकेत गुरवने बाजू सांभाळली आहे.
या गाण्याला सोनाली सोनावणे आणि केवल वलंज यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. एकूणच या रोमँटिक गाण्यात निक व अनुश्रीचा अनोखा अंदाज पाहायला मिळतोय. अखेर पदर गाण्यातील प्रियकराचं स्वप्न पूर्ण होणार का याची साऱ्यांना उत्सुकता असून हे गाणं ‘विण्मयी म्युझिक’ या युट्युब चॅनेलवर जाऊन नक्की पाहा.