तरुणांचा वाढता कल लघुपट निर्मितीकडे; सामाजिक बदलाचे नवे माध्यम बनतेय Short Film
पुणे/प्रगती करंबेळकर : लघुपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनातील भावना, विचार आणि वास्तव परिस्थिती प्रभावीपणे मांडण्याचे सक्षम माध्यम आहे. आजच्या डिजिटल युगात तरुण पिढी या माध्यमाचा वापर स्वतःच्या कल्पना आणि समाजातील वास्तव समस्यांना स्पर्श करणारे संदेश पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात करत आहे. म्हणूनच, सध्या लघुपट निर्मितीकडे तरुणाईचा कल वाढत आहे.
गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या उपलब्धतेमुळे लघुपट निर्मितीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. आता तरुणांकडे आवश्यक साधने, जसे की मोबाईल कॅमेरे, संपादन अॅप्स आणि ऑनलाइन प्रदर्शनाची साधने सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे मर्यादित साधनांमध्येही उच्च दर्जाचे लघुपट तयार करणे शक्य झाले आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये, फ्रीलान्स कलावंतांमध्ये आणि छायाचित्रकारांमध्ये या माध्यमाबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येते.
लघुपटांच्या विषयांवर नजर टाकली तर समाजातील बदल, पर्यावरण संवर्धन, मानसिक आरोग्य, लिंगभेद, ग्रामीण समस्या, नातीगोती, आणि आधुनिक जीवनातील संघर्ष अशा विविध पैलूंवर आधारित कथा दिसतात. प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी भडक दृश्ये किंवा मोठ्या कलाकारांची गरज नसते, तर काही मिनिटांत प्रभावी संदेश पोहोचविण्याची क्षमता महत्त्वाची ठरते. याच कारणामुळे लघुपट हे अनेक नवोदित दिग्दर्शक आणि लेखकांसाठी पहिले पाऊल ठरले आहे.
‘पुणे शॉर्ट फिल्म सर्कल’, ‘राष्ट्रीय लघुपट महोत्सव’, तसेच विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित होणारे लघुपट स्पर्धा तरुणांना त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देतात. अशा कार्यक्रमांमुळे केवळ प्रतिभेला वाव मिळत नाही, तर सामाजिक जाणीव असलेली नवी पिढी घडते आहे. अनेक तरुण दिग्दर्शक या माध्यमातून समाजात बदल घडविण्याचे उद्दिष्ट ठेवतात. काही लघुपटांनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्येही झेंडा फडकवला आहे.
प्रेक्षकांच्या दृष्टीनेही लघुपटांचे महत्त्व वाढले आहे. काही मिनिटांत परिणामकारक कथानक अनुभवण्याची सवय आजच्या जलदगती जीवनशैलीशी सुसंगत आहे. त्यामुळे लघुपट हे मायक्रो सिनेमा म्हणून नव्या स्वरूपात स्वीकारले जात आहे.
सामाजिक बदल, संवेदनशील विषय, आणि भावनिक नाते या सगळ्यांचा संगम म्हणजे लघुपट. ही फक्त कहाणी सांगण्याची कला नाही, तर विचार, भावना आणि समाजातील वास्तव मांडण्याचे शक्तिशाली माध्यम आहे. त्यामुळेच तरुण पिढी लघुपट निर्मितीकडे वळते आहे आणि ते या माध्यमातून केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजपरिवर्तनाचे साधन उभारत आहेत.
लघुपटासाठी कमी बजेट लागते त्यामुळे तरुणाई प्रामुख्याने लघुपट करते शिवाय लघुपट ही मोठ्या चित्रपटांची प्रयोगशाळा आहे. इथे तरुण कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक आपले प्रयोग करतात, चुका करतात आणि शिकतात. एकेकाळी मोठा खर्च, उपकरणांची कमतरता आणि मर्यादित व्यासपीठ ही अडचण होती, पण आज डिजिटल युगाने ती पूर्णतः दूर केली आहे. सध्या लघुपट महोत्सवांची संख्या वाढली आहे या महोत्सवांमार्फत नवोदित दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळते. आता झालेले नामांकित दिग्दर्शकांनीही लघुपटांपासून सुरुवात केली आहे. – सुनिल शिंदे, लेखक दिग्दर्शक