Shivani Rangole Pray To Ganpati Bappa Safe Environment For Womens
Shivani Rangole Pray To Ganpati Bappa Safe Environment For Womens: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आणि देशातील महिलांवार होणाऱ्या अत्याचाराचे प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये साडे तीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाला होता. तर त्याआधी कोलकात्यातील एका महिला डॉक्टरवर एका नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली होती. यासारख्या राज्यात अशा अनेक घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. याच सर्व घटनेचा आधार घेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने लाडक्या गणरायाकडे एक साकडं घातलं आहे.
अभिनेत्रीचा हा साकडं घालणारा व्हिडिओ झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेला आहे. या व्हिडिओत अभिनेत्रीने, सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यासह देशात ऐरणीवर आला आहे. शिंंवानीने म्हणजेच मास्तरबाईंनी गणरायाकडे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात मागितलेल्या साकड्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. व्हिडिओत अभिनेत्री पुस्तक वाचताना दिसत आहे आणि तितक्यात तिला गणपती बाप्पाचा कॉल येतो. ती कॉलच्या माध्यमातून आपलं साकडं गणपती बाप्पाला सांगते.
‘तुला शिकवीनच चांगला धडा’ फेम अभिनेत्री शिवानी रांगोळे अर्थात मास्तरीनबाई म्हणते, “हॅलो… बाप्पा कसा आहेस तू? एरवी तू आम्हाला विचारतोस? कशी आहेस? कसा आहेस? पण आज मी तुला विचारते, तू कसा आहेस? सध्या आम्ही तुझ्या उत्सवाची जोरदार तयारी करतोय आणि तुझ्या आगमनाची आतुरतेनं वाट बघतोय. यावेळी खूप लोक खूप काही तुझ्याकडे मागत असतील. मलाही तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे; पण मी माझ्यासाठी काही मागणार नाही. मला तुझ्याबरोबर काहीतरी शेअर करायचं आहे. गेले काही दिवस वर्तमानपत्र उघडलं, सोशल मीडिया उघडलं की, खूप बातम्या दिसतात. ज्यामध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कळतं. मुली म्हणजे अगदी चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल, शाळेत घडणाऱ्या अत्यंत वाईट घटनांबद्दल कळतंय. वर्तमानपत्र अगदी अशा बातम्यांनी भरून गेलेलं असतं की, ते बघून प्रचंड त्रास होतो. असं वाटतं की, शाळेसारखी जागा सेफ नसेल, तर मुलींना कुठे सेफ वाटणार? आणि म्हणून मला तुझ्याकडे असं मागायचं आहे.”
अभिनेत्री पुढे म्हणते, “मला तुझ्याकडे असं मागायचं आहे की, मुलांआधी पालकांना आपल्या मुलांना कसं वाढवायचं याचं शिक्षण दे, बुद्धी दे. मुलींनी कसं वागावं, कसं बोलावं, कसे कपडे घालावेत यापेक्षा मुलांची नजर कशी असावी, आपण आपल्या मुलाला कसे वाढवत आहोत. मुलींनी घरात ७ च्या आत यायला पाहिजे यापेक्षा आपला मुलगा ७ च्या नंतर काय करतो, तो कुठे असतो, त्याची संगत काय आहे, या गोष्टींचा पालकांनी विचार करावा, अशी बुद्धी त्यांना दे. मुलींना, बहिणींना, आत्यांना, मामींना, आजीला, आईला सुरक्षित वाटेल अशा वातावरणाची निर्मिती होऊ दे. तसंही आम्ही तुझ्या आगमनाची वाट पाहतंच आहोत. मला खात्री आहे की, तुझ्या येण्यानं हे जे मळभ आलेलं आहे ते सगळं दूर होईल आणि प्रकाशच प्रकाश पसरेल सगळीकडे आणि तू खूप लवकर ये आणि माझी ही मागणी तेवढी पूर्ण कर.”
हे देखील वाचा – सलमान खानच्या बिग बॉस १८ सीझनमध्ये हा कॉमेडियन करणार एंट्री!
शिवानी रांगोळेच्या ह्या व्हिडिओचे चाहत्यांकडून कौतुक होत असून लाईक्सचा वर्षाव होत आहे. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या शिवानी ‘तुला शिकवीनच चांगला धडा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती साकारत असलेल्या मास्तरीणबाईंच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.