जुई गडकरीला नेमकं झालं तरी काय ? अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत सांगितलं कारण
Jui Gadkari Surgery : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहतावर्ग तयार केला आहे. गेल्या काही दिवसांपू्वी अभिनेत्रीने स्वतः सर्जरी झाली असल्याची माहिती दिली होती. शिवाय तिच्या आजारपणामुळे मालिकेचं शुट देखील थांबलं असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर झाल्या होत्या. पण या चर्चांदरम्यान जुईने सेटवरचा एक व्हिडिओ शेअर करत चर्चांना पुर्णविराम दिला आहे. अशातच जुईने व्हिडिओ शेअर करत सर्जरी झाल्याची माहिती दिली आहे. नेमकी काय झालं होतं अभिनेत्रीने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.
व्हिडिओमध्ये जुई गडकरी म्हणते की, “अनेक दिवसांनंतर मी व्हिडिओ बनवत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेमकं तुला काय झालंय ? असा प्रश्न सर्वच विचारत आहेत. त्याचंच उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. जुलै महिन्यात माझा एक छोटा अॅक्सिडेंट झाला होता. त्यामध्ये माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला होता. त्यामुळे कानात आतमध्ये रक्त आलं होतं. कानाचा पडदाच फाटल्यामुळे मला खूपच त्रास होत होता. मी अर्धी बहिरी सुद्धा झाले होते. ते खरंतर स्वत:हून बरं होतं म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे आम्ही वाट बघत होतो. पण ते काही बरं झालंच नाही.”
पुढे व्हिडिओत जुई म्हणते, “म्हणून डॉक्टरांनी माझ्या कानाची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच माझ्या कानात कापूस होता. मी सर्जरीमुळे पाच दिवसांच्या सुट्टीवर होते. गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा जोमाने मी कामावर रुजू झाले आहे. या दरम्यान, मालिकेच्या टीमने मला खूप पाठिंबा दिला. मला अॅडजस्ट करून सर्वांनीच खूप समजून घेतलं. अजूनही माझ्या डाव्या कानाच्या पाठीमागे टाके आहेत. पुढचे काही महिने मला डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.”
“काळजी घे, तू लवकर बरी होशील.”, “काळजी घे आणि लवकरात लवकर बरी हो… प्लीज लवकर कमबॅक कर” असं अनेक चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीला सल्ला दिला आहे.