यंदाचा झी चित्र गौरव पुरस्कार 2024 सोहळा लवकरच टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार आहे. या वर्षीचा हा सोहळा खूप गाजणार अशी चर्चा रंगली आहे. कारण बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे नाणे खणखणीत वाजले. ‘बाईपण भारी देवा’ सारखा चित्रपट असू दे किंवा मग ‘झिम्मा 2’ सारख्या महिलाप्रधान सिनेमांनी खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिस महिलांनी गाजवलं. यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या त्या ‘उषा मंगेशकर’. तर यावर्षीच्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे ‘प्रिया बापट’. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार पटकावला तो ‘बाईपण भारी देवा’ सिनेमातल्या नायिकांनी.
या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. त्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. बॉलीवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी आणि दुसरी म्हणजेच सारा अली खान यांनी त्यांच्या अदा दाखवून प्रेक्षकांची आणि चाहत्यांची मने जिंकली. सारा अली खानने ‘ऐका दाजीबा’ म्हणत उपस्थित पाहुण्यांचे लक्ष वेधलं, तर शिल्पा शेट्टी सादर केलेल्या लावणीने या सोहळ्याला चार चांद लावले.
महाराष्ट्रातील प्रेक्षक या सोहळ्याची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. ‘झी चित्रगौरव पुरस्कार 2024’ हा सोहळा 16 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 7.०० वाजता झी मराठीवर वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे.