फोटो सौजन्य - Social Media
ZEE5 ने आपल्या पहिल्या कन्नड ओरिजिनल मिनी सीरीज ‘अय्याना माने नॉट एव्हरी होम इज अ हेवन सम हाइड डेडली सिक्रेट्स’च्या माध्यमातून कन्नड मनोरंजन विश्वात पदार्पण केलं आहे. ही सात भागांची सीरीज एक थरारक आणि सुपरनॅचरल मर्डर मिस्ट्री आहे, ज्यामध्ये रोमांच, अंधश्रद्धा आणि कौटुंबिक गुपितं यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो.
रमेश इंदिरा यांच्या दिग्दर्शनाखाली आणि श्रृती नायडू प्रॉडक्शनच्या निर्मितीखाली तयार झालेल्या या सीरीजमध्ये कुशी रवी, अक्षया नायक आणि मानसी सुधीर हे प्रमुख कलाकार आहेत. 1990 च्या दशकात सेट झालेली ‘अय्याना माने’ एका नववधूच्या जाजी (कुशी रवी) कथेवर आधारित आहे, जी नवऱ्याच्या पूर्वजांच्या घरी प्रवेश करते आणि नंतर तिचं आयुष्य एक दुःस्वप्न ठरतं. या घरात आधीच्या तीन सुनांच्या संशयास्पद मृत्यूंचं गूढ दडलेलं असतं, जे कुटुंबाच्या ईष्टदेवतेशी कोंडय्या संबंधित असते. घरातील विचित्र परंपरा, गूढ योगायोग आणि कुजबुजणारे शाप जाजीला सतावत असतात. जाजी तिच्या भोवती घडणाऱ्या घटना समजून घेण्यासाठी पोलिस अधिकारी महांतेश आणि घरकाम करणारी तयव्वा यांच्या मदतीने सत्य उलगडण्याचा प्रयत्न करते.
चिकमंगळुरच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेलं अय्याना माने हे घरही एक पात्र वाटतं, जे स्वतःमध्ये अनेक गुपितं दडवून बसलेलं आहे. दिग्दर्शक रमेश इंदिरा यांच्या मते, ही सीरीज केवळ भीती किंवा रहस्याच्या मर्यादेत न अडकता, श्रद्धा, परंपरा आणि कौटुंबिक सत्य यांचा वेध घेते. ZEE5 च्या प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ही कथा कन्नड प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार असून ती थरार, भावना आणि गूढतेचं अचूक मिश्रण आहे.
कुशी रवीने साकारलेली जाजीची भूमिका देखील प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करणारी आहे. ‘अय्याना माने’ ही सीरीज 25 एप्रिल 2025 पासून ZEE5 वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. ही मालिका प्रेक्षकांना केवळ रहस्य उलगडण्याचा अनुभव देणार नाही, तर त्यांना प्रश्न विचारायला लावेल – खरं म्हणजे काय? आणि कोणती भीती खरी आहे, कोणती केवळ परंपरांनी निर्माण केलेली आहे?