वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी तासनतास जिम केली जाते, तर कधी आहारात बदल करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर वजन झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे वजन कमी करताना सगळ्यात आधी योग्य जीवनशैली फाॅलो करणे फार आवश्यक आहे. याशिवाय वजन कमी करण्यासाठी आणि शरीराचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी पाणी पिणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्यामुळे मेटाबॉलिक रेट तात्पुरता वाढतो आणि शरीरातील कॅलरीज जलद गतीने जाळण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – istock)
नियमित किती लिटर पाणी प्यायल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल? जाणून घ्या पाणी आणि वजनचा काय आहे संबंध

हवामान, शारीरिक श्रम आणि वजनानुसार दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणे फार आवश्यक आहे. साधारणता नियमित २ ते ३ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे नकळत जेवणावर परिणाम होतो आणि खाण्यापिण्याची जास्त इच्छा होत नाही. कमी कॅलरीज शरीरात गेल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

गोड शीतपेये, सोडा किंवा पॅकबंद ज्यूस पिण्याऐवजी पाणी प्यावे. उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्यास शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते.

शरीरातील चरबीचे विघट होण्यासाठी आणि साठलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण असणे अतिशय महत्वाचे आहे. व्यायाम करताना शरीरात वाढलेला थकवा कमी करण्यासाठी पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि अनावश्यक चरबी जळून जाते.

शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाणी प्यावे. उपाशी पोटी महिनाभर नियमित कोमट पाणी प्यायल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होईल.






