

रोहित पवार यांचे खासदार सुप्रिया सुळेंना पत्र
खासदार अमोल कोल्हे यांची रोहित पवारांच्या पत्रावर प्रतिक्रिया
डिलिमिटेशन विधेयकावरून पवार कुटुंबात दुमत
Amol Kolhe reaction on Rohit Pawar Letter : शिरूर : डिलिमिटेशन बिलावरून राजकारण रंगलेले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाने या विधेयकाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. मात्र या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटातही मतभेद असल्याचे दिसून आले आहे. रोहित पवारांनी स्वतः डिलिमिटेशन बिलाला विरोध करत हे विधेयक लोकशाहीला धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. सुप्रिया सुळेंना यासाठी पत्र लिहित रोहित पवारांनी घरचा आहेर दिला. यावर आता खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत त्यांना हे पत्र पीएने वैगरे लिहून दिले असेल, असे मत व्यक्त केले.
खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी रोहित पवार यांनी सुप्रिया सुळेंना दिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "रोहित पवार यांनी सुप्रिया सुळेंना जे पत्र लिहिले आहे ते मी वाचलेलं नाही आहे. पण याबाबत आमची भूमिका पक्षाने स्पष्ट केली आहे. उद्या सकाळी आम्ही एकत्र बसू. बिलाचा ड्राफ्ट येईल. बिलावर आक्षेप का आहे, यावर उद्या सकाळी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. रोहित पवारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील आणि याची प्रत्येकाला ही मुभा आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आम्ही विचारात घेऊ. रोहित पवारांचा रोख कुणाकडे आहे हे मला माहिती नाही."
पुढे ते म्हणाले, "सर्वांनी बिलचा अभ्यास केलेला नसतो अशी वस्तूस्थिती असते. त्यामुळे एखादा नरेटीव्ह हा नरेटिव्ह असणं आणि त्याविषयी विचार करून त्या बिलात काय आहे, यावर चर्चा करणं गरजेचं असतं. शरद पवारांवर टीका होताना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचे योगदान फार मोठं आहे. हे डिलिमीटेशन बिल होऊदे नंतर जे टीका करणारे आहेत त्यांना आम्ही उत्तर देऊ. रोहित पवार आमचे नेते आहे. ते आमदार आहेत. उद्याच्या बैठकीत ते आहेत की नाही याची मला कल्पना नाही."
अमोल कोल्हे पुढे म्हणाले, "लोकसभेत जेव्हा बिल येत तेव्हा ते केवळ ऐकीव माहितीच्या आधारे नाही तर बिलमधील गोष्टी कशा आहेत, याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. हा आक्षेप पाहता त्यात तथ्य आहे, असं वाटत नाही. रोहित पवारांना हे पत्र पीए वैगरे कुणीतरी लिहून दिलं असेल. त्यात संविधान बदलाचा आक्षेप नोंदवला गेला आहे तो बिलच्या ड्राफ्टमध्ये दिसत नाही आहे. रोहित पवारांच्या पत्राचा विचार होणार आहे."
रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र का लिहिले?
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा, अशी विनंती करण्यासाठी रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिले.
रोहित पवारांच्या पत्रावर अमोल कोल्हे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
रोहित पवारांना हे पत्र त्यांच्या पीएने किंवा अन्य कुणीतरी लिहून दिले असेल, अशी खोचक प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली. तसेच पत्रातील संविधान बदलासंबंधीचा आक्षेप विधेयकाच्या मसुद्यात दिसत नसल्याचेही ते म्हणाले.
डिलिमिटेशन विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील भूमिका काय असणार आहे?
विधेयकाचा मसुदा आल्यानंतर त्यातील तरतुदी आणि आक्षेपांवर पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा केली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.