Rohit Pawar Letter : 'या निर्णयामुळे शरद पवारांच्या आयुष्यभराच्या तपाचा भंग...' रोहित पवारांचे खासदार सुप्रिया सुळेंना पत्र

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्यावरून आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिले आहे. विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे.
Rohit Pawar letter to Supriya Sule.jpg
डिलिमिटेशन विधेयकावरून रोहित पवारांचे खासदार सुप्रिया सुळेंना पत्र (फोटो - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • रोहित पवार यांचे सुप्रिया सुळेंना पत्र

  • डिलिमिटेशन बिलाबाबत पुन्हा विचार करण्याची विनंती

  • पुरोगामी विचारांना मानणान्या जनतेला मोठा धक्का - रोहित पवार

Rohit Pawar letter to Supriya Sule : बारामती : डिलिमिटेशन बिलावरून राजकारण रंगलेले असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधेयकाला पाठिंबा दाखवला आहे. यामुळे पक्षावर मित्रांपेक्षाकडून कडाडून टीका केली जात आहे. यामुळे राजकारण तापलेले असताना आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले आहे.

काय आहे रोहित पवार यांचे पत्र?

आज हे पत्र लिहिताना मनात प्रचंड अस्वस्थता आणि वेदना आहे आपले नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत. साहेबांच्या या अवस्थेनं आपल्या सर्वाच्याच मनात काहूर माजलंय, पण ते लवकरच उणठणीत बरे होतील, असा विश्वास देखील आहे. पण अशा कठीण प्रसंगी, सध्या 'डिलिमिटेशन' (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला पाठिबा देण्याबाबत सुरु असलेल्या चर्चामुळे राज्यातील पुरोगामी विचारांना मानणान्या जनतेला मोठा धक्का बसलाय

संघराज्य पद्धतीला तडा देणाऱ्या आणि २०११ साली झालेल्या १५ वर्षे जुन्या जनगणनेच्या आधारावरील या विधेयकामुळे अनुसूचित जाती-जमातींना (SC/ST) त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळणार नाहीत आणि हा अन्याय त्यांना पुढील २५ वर्षे सहन करावा लागेल. वास्तविक नवीन जनगणनेच्या आधारे जातनिहाय खरे आकडे समोर येणारच आहेत खरे तर सरकारने वेळीच ही जनगणना केली असती तर हे आधीच झालं असतं आता उशिरा का होईना पण जनगणना सुरु असून त्याआधारे २०२७ मध्ये मतदारसंघांची संविधानिक पद्धतीने फेररचना होणारच आहे, मग माज भाजपकडून त्यासाठी इतकी घाई का केली जातेय, यामागील छुपा हेतू देखील समजून घेणं आवश्यक आहे.

ठाकरे गटाचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी मांडलं लोकसभेच्या जागांचं गणित, म्हणाले, "UPपेक्षा महाराष्ट्र..."

सध्याच्या मतदारसंघातून सत्ताधारी खासदार निवडून येणार नाहीत हे स्पष्ट असल्याने आणि देशभरातील लोकांचाही वाढता विरोध उघडपणे दिसत असल्याने भाजपकडून ही घाई केली जातेय हे लपून राहिलेलं नाही. आज भाजपने ज्ञानेशकुमार यांच्या मदतीने मतचोरी करत अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आता तर संविधानाला तिलांजली देऊन गोकुळसारख्या सहकारी संस्थेवरही दरोडा घातला, ही भाजपची मूळ वृत्ती अशी असताना मतदारसंघांची पुनर्रचना पारदर्शकपणे केली जाईल, यावर कुणीच विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे आज गोड बोलणारा भाजप मतदारसंघ पुनर्रचना करताना खरा डाव टाकेल, याचा अनुभव भाजपाने आसाममध्ये जेरी मॅडरींग पद्धतीने केलेल्या मतदारसंघांच्या आखणीतून संपूर्ण देशाने पाहिलाय.

भाजपकडून डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातोय वास्तविक महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक याचा काहीही संबंध नाही. २०२३ मध्येच महिला आरक्षण विधेयक संसदेने मंजूर केलं असून आपल्या पक्षाने देखील या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या क्षणी देखील त्याची अंमलबजावणी करता येते, मग ती का केली जात नाही?

भाजपाचे अनेक नेते २०२४ मध्ये ४०० पार चा नारा देत संविधान बदलण्याची भाषा उघडपणे बोलत होते. या गोष्टी ध्यानात ठेवून देशातील जनतेने त्यांना गुडघ्यावर आणलं, संविधान बदलण्याचा भाजपाचा मूळ अजेंडा अजूनही कायम असून त्यासाठीच डिलिमिटेशनच्या माध्यमातून असंविधानिक पद्धतीने आपल्या सोईचे मतदारसंघ बनवून संविधान बदलाचं आपलं अपुरं स्वप्न पूर्ण करण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न दिसतो. भाजपाला लोकशाही आणि संविधानाबाबत प्रेम आणि निष्ठा असेल तर डिलिमिटेशन कमिटीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षनेत्याला देणार का, याचं उत्तर मिळालं पाहिजे आणि या उत्तरातूनच त्यांचा हेतु उघड होईल.

अशा परिस्थितीत आपल्याच पक्षातील सत्तापिपासू खंडोजी खोपडे हे आपल्या मनात अनेक गोष्टी भरवत असावेत, 'आर्थिक ताकद आणि सत्ता असल्याशिवाय निवडणुका जिंकायच्या तरी कशा? हा त्यांचा नेहमीचा युक्तीवाद असतो पण आपण याचा विचार करत बसलो तर सामान्य जनतेचे मुद्दे मांडायचे कुणी हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातली जनता स्वाभिमानी आणि महाराष्ट्र धर्माला जागणारी आहे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारी आहे. आपला पक्ष सत्यावर उतरून एक पाऊल पुढे आला तर इथली जनता दहा पावलं नक्की पुढे येईल. त्यामुळे आपल्यातल्या खंडोजी खोपडे यांना हाताशी धरून भाजपाने हे षडयंत्र रचलं असलं तरी या पापात आपण का भागीदार व्हायचं? त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकाला पाठींबा देण्याच्या चर्चेमुळे राज्यभरातील पुरोगामी विचारांना मानणारा मोठा वर्ग आपले निष्ठावान मतदार आणि तळागाळातील कार्यकर्ते प्रचंड नाराज आणि अस्वस्थ आहेत. दुख याचं वाटतं की, याच संतापातून आणि नैराश्यातून आज तुमच्यासह आदरणीय पवार साहेबांवरही मोठ्या प्रमाणात टीका होतेय. ज्या नेत्याने आयुष्यभर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी, पुरोगामी विचारांसाठी रक्त आटवलं, या साहेबांवर अशी टीका होताना साहेब आजारी असल्याने स्वतः भूमिका मांडू शकत नाहीत आणि स्पष्टीकरणही देऊ शकत नाहीत. अशा वेळी यांच्यावर होणारी ही टीका पाहून माझ्याप्रमाणेच तुमच्याही मनाला वेदना होत असणार यात तिळमात्र शंका नाही.

साहेबांनी गेली सहा दशके फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची जी कास धरली स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचा समतावादी आणि लोकशाहीवादी विचार जपला ते केवळ राजकारण नव्हतं तर त्यांचं आयुष्यभराचं तप होतं. आज साहेब आजारी असताना, त्यांच्यामार्ग घेतल्या जाणाऱ्या या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यभराच्या या तपाचा भंग होऊ नये, हीच माझी अत्यंत प्रामाणिक भावना आहे साहेबांच्या निष्ठेवर आणि पुरोगामी प्रतिमेवर कोणताही डाग लागू न देण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांच्याच खांद्यावर आहे. आपल्या पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असल्याने किवा काहींना सत्तेसोबत जाण्यास भाग पाडलं जात असल्याने त्यांचा आपल्यावर दबाव असणं स्वाभाविक आहे, पण ज्यांना जायचं असेल त्यांना खुशाल जाऊ द्या. त्यांचे खरे चेहरे देखील समोर येऊ द्या. कुणी गद्दारी करणार असेल तर असे गद्दार आमदार, खासदार इथली स्वाभिमानी जनता पुन्हा कदापि निवडून देणार नाही. कोणताही निर्णय घेताना केवळ खासदार, आमदार यांचं मत महत्वाचं नसतं तर पक्षासाठी निवडणुकीत रात्रंदिवस झटणारे लाखो कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार, विचार आणि नागरिकांची भावना देखील तेवढीच महत्वाची असते त्याचा देखील विचार होणं गरजेचं आहे/

राहुल गांधी करणार शरद पवारांची मनधरणी; ब्रीच कॅन्डी रूग्णालयात घेणार भेट

"मला आमदार आणि खासदारांनाही सांगायचंय की, दबावापुढे झुकून संविधानाशी द्रोह करणार नाही हे तुम्हीही हिंमत करुन दाखवून द्या यासंदर्भात तुम्हालाही भूमिका स्पष्ट करावी लागेल, धाडस दाखवावं लागेल, आपला पक्ष लोकशाहीचा आदर करणार आहे. त्यामुळे उघड मतं मांडावीत, पण आपण डोळे झाकले म्हणजे लोकांचं लक्ष आपल्याकडे नाही असं कुणीही समजू नये आपण ठाम भूमिका घेतली तर ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्याचा विश्वासघात होणार नाही, शिवाय त्याचे प्रश्नही बाजूला सरणार नाहीत, पण मागील काही काळात राज्याच्या राजकारणातून सर्वसामान्य जनता हरवली असून दुर्दैवाने राजकारणाच्या केंद्रस्थानी केवळ सत्ता, पैसा आणि नेते आले आहेत. यामुळेच आजवरच्या सर्वांत महाभयंकर अशा दुष्काळासारख्या प्रश्नावरचं लक्ष देखील बाजूला गेलं, परिणामी सामान्य जनता प्रचंड अडचणीत आली. त्यांचा आवाज कोण मांडणार? याचा आपल्याला अत्यंत गांभीयनि विचार करावा लागेल,"

Q

रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र का लिहिले?

A

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा, अशी विनंती करण्यासाठी रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिले आहे.

Q

रोहित पवार यांनी कोणाला पत्र लिहिले आहे?

A

आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना हे पत्र लिहिले आहे.

Q

डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडले आहे?

A

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दर्शविल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या भूमिकेवरून मित्रपक्षांकडून टीका होत आहे.