Baba Siddique's last speech in the presence of Ajit Pawar
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मुंबईसह देशभरामध्ये एकच खळबळ उडाली. राजकीय आणि सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या बाबा सिद्दीकी यांना यापूर्वी देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. काल (दि.12) रात्री त्यांची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. बाबा सिद्दीकी यांचा अवघ्या आठ महिन्यांपूर्वी अजित पवार गटामध्ये प्रवेश झाला होता. त्यानंतर वर्धापन दिनी केलेले भाषण हे त्यांचे अखेरचे ठरले.
बाबा सिद्दीकी हे बांधकाम व्यवसायामध्ये होते. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. बाबा सिद्दीकी यांनी 40 वर्षे राजकीय क्षेत्र गाजवले आहे. आधी नगरसेवक आणि त्यानंतर आमदार असा त्यांचा प्रवास होता. 1999, 2004 आणि 2009 यावेळी त्यांनी मंत्रीपद भूषवले होते. यावेळी ते कॉंग्रेस पक्षामध्ये होते. मात्र चार महिन्यांपूर्वी त्यांनी पक्षांतर केले. मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी केलेले भाषण अखेरचे ठरले.
शेवटच्या भाषणात काय म्हणाले बाबा सिद्दीकी?
मुंबईमध्ये वर्धापन दिनानिमित्त बाबा सिद्दीकी यांनी अखेरचे भाषण केले. यावेळी अजित पवार यांच्यासह पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शेवटचे भाषण दिले. आपल्या भाषणामध्ये बाबा सिद्दीकी म्हणाले की, “राष्ट्रवादी परिवारामध्ये आल्यामुळे मी नशीबवान समजतो. 48 वर्ष एका पक्षामध्ये होतो. पण अजित पवार यांचा संघर्ष मी पाहिला आहे. निवडणुकीमध्ये जे झालं ती एक लाट होती. आपल्या पक्षाचे विचार स्पष्ट पाहिजे. धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत स्पष्ट पाहिजे. आपल्या मित्र पक्षाचे नसले तरी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आपली भूमिका स्पष्ट मांडून पुढची येणारी निवडणूक आपल्याला खूप विचारपूर्वक लढली पाहिजे.”
पुढे ते म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीवेळी मतदारवर्ग सुद्धा शांत होता. त्यामुळे लोकांचा अंदाज येत नव्हता. यावेळी घरातून कोणाला बाहेर पडा हे सांगण्याची गरज नाही पडली. सगळ्यांनी स्वतः बाहेर पडून मतदान केलं आहे. त्यामुळे लोकांना समजले आहे. अजित पवार यांचे दुःख मी समजू शकतो. त्यांची परिस्थिती मी जाणतो. महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा कोरोना काळामध्ये तुम्ही सर्व काही बंद असताना तुम्ही ज्या पद्धतीने काम करत होता. त्यानंतर आता तुमचं काय दुःख असेल मी समजू शकतो.”
भरघोस निधी दिला पण…
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही भरघोस निधी आता पण दिला आहे. पण इथे बसलेल्या लोकांना सुद्धा हे माहिती नाही. सध्या सोशल मीडियाचा काळ आहे. त्यामुळे दादा आपल्याला हे सगळं दाखवावं लागणार आहे. जे दिसतं ते विकतं. सगळ्या समाज घटकांसाठी आपण करतोय आणि करत राहू. काही लोकांनी संविधानाचा मुद्दा समोर आणला. आपल्याला हे माहिती नव्हतं की हे इतकं खोलवर जाईल. पण मी सांगतो आपल्या पक्षाच्या पुस्तिकेवर आपण आधी संविधान छापलं आहे. अजित पवार यांच्यासोबत मी काम करणार आहे. आम्ही नशीबवान आहोत की, आमच्याकडे अजित पवार यांच्यासारखे नेतृत्व आहे. जे स्पष्ट सांगतात की मी करणार तर मी करणारच. अजित पवार जे काम करतात ते आता समजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याचं काम आपलं आहे,” असे म्हणत बाबा सिद्दीकी यांनी आपले शेवटचे भाषण गाजवले. अजित पवार यांच्यासमोर झालेले हे बाबा सिद्दीकी यांचे भाषण दुर्देवाने अखेरचे ठरले.