मिरा-भाईंदर / विजय काते : राज्यात सध्या निवडणूकीचे वारे वाहत आहेत आणि अशातच आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. निवडणूकीच्या मतदार यादीचा सावळा गोंधळ आता काही नवीन राहिला नाही. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवरच राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेले आरोप प्रत्यारोपांची मालिका अद्यापही सुरुच आहे. काही दिवस आधी कॉंग्रेसने भाजपवर वोट चोरीचे आरोप केले होते. काँग्रेसकडून काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नगरसेवक संजय थेराडे यांच्यावर “वोट चोरी”चे गंभीर आरोप करण्यात आले होते. काँग्रेसने थेराडे यांचे नाव दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये असल्याचा दावा करत, त्यातील एका मतदार यादीतील पत्त्याबाबत मोठा खुलासा केला होता.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, ज्या इमारतीत थेराडे यांचे नाव नोंदवले आहे, ती इमारत केवळ तीन मजली असूनही त्यांच्या मतदार यादीतील पत्ता चौथ्या मजल्याचा असल्याचे दिसून आले. त्यामुळे मतदार नोंदणीमध्ये गोंधळ करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.
मात्र, या सर्व आरोपांवर आज नगरसेवक संजय थेराडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी काँग्रेसवर पलटवार करत म्हटले की, “१३ वर्षांपूर्वी जुना पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या राजदीप व्हिलामध्ये शंभराहून अधिक नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली होती. यातील बहुतांश नावे बांगलादेशी नागरिकांची होती. त्या वेळी काँग्रेसच सत्तेत होती, पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही.” असा पटलवार देखील भाजपकडून करण्यात आला होता. अशातच आता पुन्हा एकदा पुराव्यासह सगळ्याचा खुलासा केला आहे, असं कॉंग्रेसचं मत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिरा-भाईंदर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात “वोट चोरी” केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते दीपक बागरी यांनी केला आहे. त्यांनी पुराव्यासह दावा केला आहे की, भाजपचे माजी महापौर, माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी तसेच आमदार नरेंद्र मेहता यांच्या 7/11 कंपनीच्या संचालकांची नावे दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात नोंदवली गेली असून, त्यांनी दुबार मतदान केले आहे.
दीपक बागरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी महापौर डिंपल विनोद मेहता (नगरसेविका प्रभाग क्र. 12) यांचे नाव 146 ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी क्र. 120, अनु क्र. 412 (XCE 6543227) मध्ये नोंदवले आहे. मात्र, त्यांच्या 2017 च्या नगरसेवक निवडणूक प्रतिज्ञापत्रात मतदार ओळखपत्र क्रमांक XCE 4062980 दाखवले गेले आहे.
असे असताना, 145 मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात त्यांचे नाव यादी क्र. 104, अनु क्र. 629 (YJE 4683827) अंतर्गत नोंदवले गेले असून, त्यांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी भारती हायस्कूल, खारीगाव (पूर्व) या मतदान केंद्रावर सकाळी ९ ते ११ दरम्यान मतदान केले असल्याचा पुरावा काँग्रेसने सादर केला आहे .त्यांचे पती विनोद लालचंद मेहता यांचेही नाव 145 मतदारसंघात नोंदवले असल्याचे उघड झाले आहे. याचप्रमाणे माजी नगरसेवक संजय थेराडे, त्यांची पत्नी वनिता थेराडे, माजी नगरसेविका कुसुम गुप्ता आणि त्यांचे पती संतोष गुप्ता, तसेच आमदार नरेंद्र मेहता यांच्या 7/11 कंपनीचे संचालक संजय सखाराम सुर्वे यांची नावेही दोन्ही मतदारसंघांत असल्याचे आरोपात म्हटले आहे.
दीपक बागरी यांनी सांगितले की, निवडणूक प्रचारादरम्यान या दुबार मतदारांची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे रीतसर करण्यात आली होती, मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.त्यांच्या म्हणण्यानुसार, “भाजपच्या लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधीत्व कायद्याचा भंग केला असून निवडणूक अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीररित्या मतदान करून निकालावर परिणाम केला आहे.”काँग्रेसने या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.