Chhagan Bhujbal's reaction on Baba Siddiqui's murder
नाशिक : अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. निर्मल नगर परिसरामध्ये येथे बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या मुलाच्या झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हल्ला करण्यात आला. तीन हल्लेखोरांनी त्यांच्या तीन चार राऊंड फायर केले. त्यांच्या छातीवर गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधारी महायुती व गृहमंत्री यांच्यावर टीका केली जाते आहे. महायुती सरकारला आता सत्ताधारी अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून देखील घराचा आहेर मिळाला आहे.
नाशिकच्या येवल्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांना सुनावले आहे. मंत्री भुजबळ म्हणाले, बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षापासून ओळखत होतो. त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना Y सुरक्षा सुरक्षा देण्यात आली होती. मात्र सुरक्षा देऊन काही होत नाही. धमकी कोणी दिली होती याच्या तपास करायला पाहिजे होतं. पोलीस काय करीत होते?, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
पुढे ते म्हणाले, “आमच्या भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुंबई पोलिसासाठी हे एक चॅलेंज आहे. 10 /20 हजार रुपयांमध्ये ही पोरं हत्या करत आहेत. ही कॉन्ट्रकट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड दिलं पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील आहे,” असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांना सुनावले आहे.
अजित पवारांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर अजित पवार हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे,” अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.