Chhagan Bhujbal's cousin Sameer Bhujbal in contact with Mahavikas Aghadi
नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यासाठी सर्व नेत्यांची जोरदार तयारी सुरु असून इच्छुकांची देखील घाई सुरु आहे. दोन्ही युतीमधील जागावाटप फॉर्म्युला यासाठी दिल्लीवारी आणि बैठका सुरु आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार तयारी देखील सुरु आहेत. मात्र अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या घरामध्येच नाराजीनाट्य सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्व नेत्यांच्या महत्त्वकांशा वाढल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे आता समीर भुजबळ यांच्या इच्छेवर पाणी फिरले आहे. नांदगावला सध्या शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहे. सुहास कांदे यांना नांदगावमधून तिकीट मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे समीर गायकवाड हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कामध्ये असल्याच्या चर्चा आहेत.
काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना अजित पवार गटाकडून विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी देण्यात आली. त्यानंतर आता समीर भुजबळ यांच्या राजकीय नाराजीचा सूर समोर येत आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
समीर भुजबळ हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, समीर भाऊ माझ्याबरोबर आहेत. आम्ही अजितदादा सोबत आहोत. आम्ही काम करत आहोत. तो येवल्यामध्ये काम करणार आहे. आता या बातम्या कशा आल्या. याबाबत माहित नाही. समीर भाऊंनी उभं राहावं, असं तुमच्या मनात आहे का? त्यांना मुंबईमध्ये काम आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणी जावं लागेल. नाशिकमध्ये लक्ष ठेवावे लागेल. येवल्यात लक्ष घालावे लागेल, तेव्हा आमचे मागचे सात-आठ आमदार निवडून आले होते तेवढे सगळे निवडून येतील, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज निर्णायक बैठक होणार आहे उमेदवार पाडायचे हे लढायचे याबाबत मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. याबाबत प्रश्न केल्यावर छगन भुजबळ यांनी टोला लगावला आहे. भुजबळ म्हणाले की, ही लोकशाही आहे, ते जी भूमिका घेतील ते घेतील. माझं म्हणणं आहे की, त्यांनी उमेदवार उभे करावे. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. त्यांनी सुद्धा आपले नशीब आजमावून पाहावे. माझ्या सगळ्यांनाच शुभेच्छा आहेत, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना लगावला आहे.