कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक' (Photo - Social Media)
कॉकरोच जनता पार्टीमध्ये (CJP) मोठी फूट पडल्याचं समोर आलं आहे. आंदोलनातून उभ्या राहिलेल्या या पक्षात आता अंतर्गत मतभेद चांगलेच उफाळून आले आहेत. मूळ आंदोलनाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र वाट धरत ‘कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक’ (CJP Democratic) या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. अहमदाबादचे रहिवासी आणि आंदोलनाशी संबंधित असलेले मनीष ब्रह्मभट्ट यांनी ही घोषणा केली.
ब्रह्मभट्ट यांनी CJPवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते, आंदोलनाच्या मूळ उद्देशापासून पक्ष भरकटला असून आता तो ‘टीम केजरीवाल’ बनला आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनात आपण महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगत त्यांनी सध्याच्या नेतृत्वाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वावर निशाणा साधताना ब्रह्मभट्ट यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, दीपके यांनी कोणत्याही मूळ कार्यकर्त्यांशी चर्चा न करता घरबसल्या 12 जणांची टीम तयार केली. या टीममध्ये आम आदमी पार्टीशी संबंधित लोक, मित्र आणि मैत्रिणींचा समावेश केल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रत्येक राज्यातून पाच प्रतिनिधी असावेत, अशी आमची भूमिका होती. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या हातात संपूर्ण निर्णयाची सत्ता जाणार नाही, असं ब्रह्मभट्ट यांचं म्हणणं आहे. मात्र, ही मागणी मान्य झाली नाही आणि त्यानंतर मनमानी कारभार सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला.
मनीष ब्रह्मभट्ट यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरही जोरदार टीका केली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आंदोलन यशस्वी झाल्यानंतर केजरीवाल यांनी अभिजीत दीपके यांच्यासोबत ‘डील’ करून आंदोलनाची दिशा बदलल्याचा दावा ब्रह्मभट्ट यांनी केला.
CJPच्या नव्या कार्यकारिणीत मुस्लिम आणि शीख समाजातील प्रतिनिधित्व नसल्याचाही आरोप त्यांनी केला. या सर्व कारणांमुळेच वेगळा पक्ष उभारण्याचा निर्णय घेतल्याचं ब्रह्मभट्ट यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ब्रह्मभट्ट यांनी केलेल्या या आरोपांवर अभिजीत दीपके, CJP किंवा अरविंद केजरीवाल यांच्याकडून प्रतिक्रिया समोर आली आहे का, याबाबत अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सध्या हे आरोप ब्रह्मभट्ट यांनी केलेले दावे म्हणूनच पाहावे लागतील.






