Devendra Fadnavis Badlapur poster viral
बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर राज्यामध्ये चर्चांना उधाण आले. या प्रकरणामुळे आंदोलन देखील मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यानंतर पोलिसांनी 23 सप्टेंबर रोजी मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर पोलिसांनी केला. पोलिसांसोबतच्या झालेल्या झटापटीमध्ये पोलिसांनी केलेल्या स्वरक्षणार्थ चकमकीमध्ये अक्षय शिंदे मारला गेला. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. मात्र आता बदलापूरमध्ये गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास पोस्टर लागले आहेत.
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर बदलापूर परिसरामध्ये काही लोकांनी फटाके फोडले. तसेच मिठाई आणि पेढे देखील वाटले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे काहींनी कौतुक केले. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचे काही पोस्टर बदलापूर आणि मुंबई भागामध्ये लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ‘बदलापुरा’ असे पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
हे देखील वाचा : आता युतीत मलाच जागा नाही, त्यामुळे मी…; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईमध्ये लावण्यात आलेल्या पोस्टरवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. हातामध्ये बंदूक धरुन निशाणा धरत असलेले हे पोस्टर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे. या बॅनरवर ‘बदला पुरा’ असं लिहण्यात आलेलं आहे.हे पोस्टर सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. हे पोस्टर कोणत्या नेत्याने लावले आहे याबाबत कोणतीही माहिती पोस्टरवर नमूद करण्यात आलेली नाही. दुसरीकडे या पोस्टरवरुन विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”आरोपी अक्षय शिंदेच्या पूर्व पत्नीने लैंगिक अत्याचाराची एक तक्रार केली होती. दरम्यान याच्या चौकशीसाठी त्याला नेले जात होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर गोळी झाडली. त्यामुळे पोलिसांनी संरक्षणार्थ गोळी चालवली आहे. विरोधक हे प्रत्येक गोष्टीत प्रश्न उपस्थित करतात. या आरोपीला फाशी देण्याची मागणी वारंवार हेच विरोधी पक्ष करत होते. मात्र पोलिसांवर गोळी चालवली जाते, तेव्हा पोलीस आपले रक्षण करणार की नाही ? मला असं वाटत या विषयावर या प्रकारे राजकारण करणे हे अत्यंत चुकीचे आहे, असे मत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.