Sharad Pawar Retirement: 12 डिसेंबरला शरद पवार निवृत्त होणार? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया अन् चर्चेला उधाण

Devendra Fadnavis on Sharad Pawar Retirement : शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होणार, अशा चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत महत्त्वाचं विधान केलं आहे.
शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलंशरद पवार राजकारणातून निवृत्त होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Published on: 
Updated on: 
  • शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा

  • देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

  • शरद पवारांच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

Devendra Fadnavis on Sharad Pawar Retirement : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच चर्चेने जोर धरला आहे आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीची! येत्या 12 डिसेंबरला वाढदिवसाच्या दिवशी शरद पवार राजकारणातून निवृत्ती जाहीर करणार असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा रंगली आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शरद पवार साहेबांना उत्तम आरोग्य लाभावं, ही आमची सर्वांची इच्छा आहे. पवार साहेब आजही सक्रिय आहेत. त्यांना मी जवळून पाहिलं आहे. ते सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आणि कामांमध्ये रस घेत असतात.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, पवार साहेब आपल्या आयुष्यात कधीच थांबणार नाहीत. ते काही ना काही सकारात्मक काम करत राहतील, असा माझा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा करणं योग्य नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये जाणार?

दरम्यान, शरद पवार यांनी राजकारणातून बाजूला व्हावं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा, अशी चर्चा सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचीही चर्चा होत आहे.

मात्र, या चर्चांवर अद्याप कोणताही अधिकृत शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत सध्या केवळ तर्कवितर्क लावले जात आहेत.

पवारांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी आणि प्रभावशाली नेते आहेत. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी राजकारणात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

आता 12 डिसेंबरला शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, फडणवीसांच्या वक्तव्यामुळे पवारांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना नवा ट्विस्ट मिळाला आहे.