Disha Salian Case Rohit pawar press conference for shiv sena aaditya thackeray in marathi
मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा नवीन विषयाने राज्याचे राजकारण ढवळून काढले आहे. औरंगजेबाच्या कबरीनंतर आता दिशा सालियन मृत्यू प्रकरण ऐरणीवर आले आहे. या प्रकरणामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे विरोधक हे प्रकरण मुद्दाम उखरुन काढत असल्याचा आरोप करत आहेत. याबाबत शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रोहित पवार यांनी विधीमंडळ आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला.
रोहित पवार यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल नाशिकमध्ये जी घटना घडली. ज्यामध्ये दोन SC समाजाच्या मुलांची हत्या झाली. ते दोघे सख्खे भाऊ होते. त्यातील एक अजित पवारांच्या पक्षातील उपाध्यक्ष देखील होता. रोज राज्यामध्ये अशा पद्धतीच्या हत्या, महिलांवरील अत्याचार हे राज्यामध्ये सुरु आहे. हे दुर्दैवी आहे. आम्हाला अधिवेशनामध्ये फक्त गोल गोल फिरवणारे उत्तर मिळत आहे. नागपूर दंगलीवर एकाच प्रश्न दोन दिवस मुख्यमंत्री वेगवेगळे उत्तर देत आहेत. यामुळे आपलं गृहखातं कुठेतरी कमी पडत आहे आणि ते दिसत आहे, असे स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रोहित पवार पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहामध्ये सांगत होते की मंत्र्यांनी बोलताना संयम पाळला पाहिजे. पदावर असताना राजधर्माचे पाळण केले पाहिजे असे फडणवीस सांगतात. मात्र हे त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलण्यापेक्षा थेट त्यांचे मंत्री नितेश राणे यांना सांगावे. त्यांनी असं बोलण्यापेक्षा नितेश राणे यांना राजीनामा दे असं सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं. एका मंत्र्याकडून आग लावण्याचं काम झालं आणि या आगीमध्ये सामान्य लोकांची घरं जळून खाक झाली. नंतर तुम्ही म्हणता की मंत्र्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. होईपर्यंत शांत बसण्याचं आणि झाल्य़ानंतर तत्वज्ञान द्यायचं हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही,” असा घणाघात रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
रोहित पवार यांनी दिशा सालियान प्रकरणावरुन देखील महायुती सरकारला घेरले आहे. ते म्हणाले की, “कोणत्याही व्यक्तीने आपल्या मुलीसाठी आणि एका महिलेसाठी न्याय मागण्याचा प्रयत्न केला असेल तर आमचा प्रयत्न असेल की त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. पण न्याय मागताना त्याठिकाणी काय खरं घडलं हे सुद्धा लोकांना माहिती पाहिजे. दिशा सालियन आणि सुशांत सिंग रजपूत यांच्या आत्महत्येवेळी त्यांच्या आई वडिलांनी वेगळी भूमिका घेतली होती. आता चार वर्षानंतर ते वेगळी भूमिका मांडत आहेत. जे योग्य आहे त्या प्रकारे हे प्रकरण पुढे गेले पाहिजे अशी आमची इच्छा आहे,” असे स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
रोहित पवार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या महायुती सरकारवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, “येथून पुढे सगळे दिवस या प्रकरणाचं भाजपकडून वेगळं राजकारण केलं जाईल. दिशा सालियनच्या वडिलांनी तेव्हा सांगितलं होतं की या प्रकरणाचं राजकारण करु नये. आजपासून यावर राजकारण होताना तुम्हाला दिसेल. कारण जेव्हा भाजप राजकारण करत तेव्हा एक हेतू त्यामागे असतो. बिहारच्या निवडणुकीवेळी सुशांत सिंग रजपूत याच्या मृत्यूचे राजकारण भाजपकडून करण्यात आलं. आता आजपासून भाजपवाले यावर बोलायला सुरुवात करतील. चार महिन्यांनी बिहारच्या निवडणूका आहेत. तुम्ही फक्त टायमिंग बघा,” असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे रोहित पवार म्हणाले की, “आता बिहारच्या निवडणुका आणि मुंबईच्या महापालिका निवडणूका डोळ्या समोर ठेवून भाजपने सुशांत सिंग रजपूत आणि दिशा सालियन यांचा मुद्दा समोर काढला आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे देखील भाजपकडून राजकारण केले जात आहे. आदित्य ठाकरेंचे नाव यामध्ये घेतले गेले आहे. पण मी त्यांना जवळून ओळखतो. त्यांचा संपर्क आणि त्यांचं बोलणं हे मला माहिती आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी आदित्य ठाकरे यांचं नाव या प्रकरणामध्ये जोडू शकत नाही. याच्याशी आदित्य ठाकरे यांचं काहीही संबंध नाही असा आत्मविश्वास मला आहे,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपला विश्वास व्यक्त केला आहे.