Maharashtra Election: विरोधकांच्या टीकेला महत्त्व देत नाही, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा, प्रितम म्हात्रे यांचं वक्तव्य
रायगड /किरण बाथम :-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाची जय्यत तयारी सुरु आहे. सध्या राज्यात विधानसभेचे वारे वाहत असून अनेक राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांकडून विधानसभेसाठी उमेदवार जाहीर होत आहेत. राज्यस्तरीय सर्वच गटात चुरशीची लढाई होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता शेकापचे प्रितम म्हात्रे यांनी नुकताच उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. यावेळी म्हात्रेंच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. अर्ज दाखल कतरताना उमेदवार त प्रितम म्हात्रे यांनी प्रतिस्पर्ध्यांना चांगलाच टोला लगावला आहे.
हेही वाचा-“माझ्या पक्षाला कोर्टातून निशाणी मिळाली नाही…,” सत्तासंघर्षावरुन राज ठाकरेंचा टोला
सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर शाब्दिक वार प्रतिवार करत आहेत. शेकापचे प्रितम म्हात्रे यांनी नवी मुंबई विधानसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केला असून समर्थकांनी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. म्हात्रे यांनी दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांच्या स्मारकाला वंदन करुन अर्ज दाखल केला. दरम्य़ान प्रितम म्हात्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने स्थानिक आणि उरण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हात्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी जासई येथे जमले होते.
यावेळी, म्हात्रेंच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आलं आहे. 190 उरण विधानसभा क्षेत्रात आतापर्यंत प्रमुख लढत लढणाऱ्यांमध्ये माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर, विद्यमान आमदार महेश बालदी आणि शेतकरी कामगार संघाच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रितम म्हात्रे हे निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये येत्या 3 तारखेला नक्की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार आणि आपली निशाणी नेमकी कोणती असणार याबाबत म्हात्रेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी म्हात्रे म्हणाले की तरुणांच्या बेरोजगारीचा मुद्दा माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. शिक्षण असूनही समाधानकारक नोकरी नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य दिसून येत आहे. पुढे प्रितम म्हात्रे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. म्हात्रे म्हणाले की, विरोधकांच्या टीकेला आम्ही कधीच महत्त्व दिलेलं नाही, त्यांना आम्ही आमच्या कामातून योग्य उत्तर देणार आहोत.
हेही वाचा-मनसेच्या उमेदवाराचा हलगर्जीपणा नडला, वेळेत न पोहोचल्याने अर्ज दाखल करून घेण्यास नकार
विधानसभेच्या निवडणुकांच्या धर्तीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बरेच अंतर्गत वाद समोर येत आहेत. उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांंनी पक्षाच्या विरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. एकीकडे पक्षातील अंतर्गत वाद आणि दुसरीकडे अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱे बंडखोर नेते यांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सत्तेसाठी अतितटीचा सामना सुरु आहे. त्यासोबत तिसरी आघाडी देखील अॅक्शन मोडवर असल्य़ाने निवडणुकीत कोणत्या गटाची सत्ता येणार आणि कोण कोणत्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार याबाबत जवता कोणत्या पक्षाला कौल देणार हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे.