फोटो सौजन्य- प्रतिनिधी
कर्जत/ संतोष पेरणे: कर्जत विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या निर्धारित वेळेत नामांकन अर्ज भरता आला नाही.नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली असताना मनसेचे अधिकृत उमेदवार जनार्दन परशुराम पाटील यांना अर्ज न भरताच परतावे लागले.दरम्यान,काही काळ थांबून मनसेचे कार्यकर्ते हात हलवत परतावे लागल्याने मनसैनिक नाराज झाले.
प्रशासनाने दिल्या वेळेसंबंधी सूचना
कर्जत मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामांकन अर्ज दाखल करण्यास पाच मिनिटे शिल्लक असून आणि त्यानंतर पुन्हा एकदा कार्यालयाचे बाहेर येवून तीन वाजले असल्याचे जाहीर करीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय जाधव यांनी ध्वनिक्षेपक वरून मुदत संपली असल्याचे जाहीर केले.त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे दार आतमधून बंद करण्यात आले.त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात दोन अपक्ष उमेदवार हे नामांकन अर्ज भरण्यासाठी हजर होते.
वेळ संपल्याने अर्ज स्वीकारता येणार नाही
साधारण तीन वाजून तीन मिनिटांनी मनसेचे कार्यकर्ते हे उमेदवार जनार्दन परशुराम पाटील यांच्यासह जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील तसेच अन्य कार्यकर्ते हे तेथे पोहचले.मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनाबाहेर असलेले पोलीस यांनी मुदत संपल्याने दालन बंद झाले असल्याचे सांगितले.त्यावेळी मनसेचे उमेदवार पाटील आणि जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेण्याची मागणी केली.मात्र अर्ध्या तासांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचा निरोप असून वेळ संपल्याने अर्ज स्वीकारता येणार नाही असे जाहीर केले.त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते हे नामांकन अर्ज न भरता परत फिरले.
मनसेने नामांकन अर्ज भरण्यासाठी मुद्दामहून उशीर केला काय?
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन परशुराम पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षाचा ए बी फॉर्म देखील देण्यात आला होता.मात्र नामांकन अर्ज भरायला वेळेवर पोहचले नसल्याने मनसेचा उमेदवार या निवडणुकीत दिसणार नाही.मात्र मनसेने नामांकन अर्ज भरण्यासाठी मुद्दामहून उशीर केला काय?यामागे काही राजकारण आहे काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कर्जतमध्ये तिरंगी लढत
कर्जत मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश थोरवे विरुद्ध ठाकरें गटाचे उमेदवार नितीन सावंत यांच्यात प्रमुख लढत होणार आहे मात्र अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन ही लढत तिरंगी केली आहे. या निवडणूकीत कोणती शिवसेना बाजी मारते की अनपेक्षितपणे अपक्षाचा विजय होतो हे पाहणे औत्सुकाचे असणार आहे.