
ठाकरे गटाला मोठा धक्का; 'या' माजी आमदाराचा अनेक पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. कळमनुरीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्यासोबत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. आमदार संतोष बांगर यावेळी उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. समाजाचे काम करा, शिवसेनेचे काम करा. तुमच्या विकासकामांसाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी शिवसेना कायम पाठीशी उभी राहील. कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असे शिंदे म्हणाले.
हिंगालीत मेळावा
हिंगोलीतील अपूर्ण विकासकामे आणि पायाभूत सुविधांसाठीही सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, लवकरच हिंगोलीत मोठा मेळावा आयोजित करण्याचे आवाहन करून आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
FAQ
१. शिंदे गटात कोणी प्रवेश केला आहे?
कळमनुरीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
२. पक्षप्रवेश कोणाच्या उपस्थितीत झाला?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
३. डॉ. संतोष टारफे यांच्यासोबत आणखी कोण सहभागी झाले?
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले आणि माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.