
नरेंद्र मोदींना तुरुंगात जावे लागले असते'; माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांचे विधान
नवी दिल्ली : गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुरू असलेला तपास काँग्रेसमधील काही नेत्यांनीच थांबवला होता. त्यामुळे मोदी तुरुंगात जाण्यापासून वाचले, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी केला आहे. काँग्रेसला आजही या निर्णयाचे राजकीय परिणाम भोगावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले. बंगळूरु येथे सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री असलेल्या मोईली यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. महत्त्वाचे निर्णय घेण्यास आणि त्यांची ठामपणे अंमलबजावणी करण्यास पक्षाने कचरू नये. सतत साशंक राहणे म्हणजे विरोधकांना स्वतःला संपवण्याची संधी देण्यासारखे आहे, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाचा संदर्भ देताना मोईली म्हणाले की, गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शाह यांना या प्रकरणात अटक झाली होती. न्यायालयाने त्यांना गुजरातबाहेर राहण्याचे निर्देशही दिले होते. त्यांच्यावरील खटला अन्य राज्यात चालवण्यात आला.
अमित शाह यांच्यानंतर नरेंद्र मोदी यांची पाळी होती. त्यांनाही तुरुंगात जावे लागले असते आणि गुजरातबाहेर राहावे लागले असते. मात्र, काँग्रेसमधील काही नेत्यांनी तपास थांबवला, त्यामुळे ते तुरुंगात जाण्यापासून वाचले, असे मोईली म्हणाले.
सोनिया गांधींच्या सुधारणांना पक्षातूनच विरोध
सोनिया गांधी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल घडवू इच्छित होत्या. भविष्यातील राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी मोईली यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीच्या शिफारशी लागू करण्यास सोनिया गांधी तयार होत्या. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी प्रस्थापित व्यवस्था बदलण्यास विरोध केला. या सुधारणा लागू झाल्या असत्या, तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले नसते, असे मतही मोईली यांनी व्यक्त केले.
मनमोहन सिंग यांचा निर्णय नव्हता
मोदी यांच्याविरोधातील तपास थांबवण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा नव्हता, असे मोईली यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमधील काही नेत्यांनीच तपास रोखल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, संबंधित नेत्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
FAQ
1. नरेंद्र मोदी यांच्याबाबत वीरप्पा मोईली यांनी काय दावा केला?
मोदी यांच्याविरोधातील तपास काँग्रेसमधील काही नेत्यांनी थांबवला होता, त्यामुळे ते तुरुंगात जाण्यापासून वाचले, असा दावा त्यांनी केला.
2. हे विधान कोणी केले आहे?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी हे विधान केले.
3. वीरप्पा मोईली यांनी हे विधान कुठे केले?
बंगळूरु येथे सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे विधान केले.