

महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? सपकाळांचा सवाल
पुणे न्यायालयातील गोळीबारावरून सरकारवर टीका
मुंबई-गोवा महामार्गावरून नितीन गडकरींना लक्ष्य
मुंबई : पुण्यातील न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून राज्यभरात खळबळ उडाली आहे. पुण्यात कायदा व सुव्यवस्थेवरून आधीपासूनच प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आज झालेल्या घटनेमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या पुण्यासारख्या शहरात अश्या घटना वारंवार घडत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे बोलले जात आहेत. अश्यातच आता यावरून राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत असून विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली. 'महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?' असा संतप्त सवालही त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
शिवशंभू स्वराज्य संघटनेच्या महाड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच पाचड येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी मानवंदना दिली.
न्यायालयाच्या दारातच गोळीबार होत असेल तर ही राज्यातील अराजकतेची गंभीर बाब आहे, असे सपकाळ म्हणाले. गुन्हेगारांना पोलीस आणि कायद्याची भीती उरलेली नाही. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या परिस्थितीचे गांभीर्य मान्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरूनही सपकाळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष्य केले. या महामार्गाचे मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला, मात्र १२ वर्षे उलटूनही काम पूर्ण झालेले नाही, असे ते म्हणाले. महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आणि ठेकेदारांना झुकते माप दिल्याचा आरोप करत कोकणातील नागरिकांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत असल्याची टीका त्यांनी केली.
कोकणात उद्योग आणि प्रकल्प आले पाहिजेत; मात्र तेथील पर्यावरणाचा नाश करून विकास नको, अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली. हायड्रो प्रकल्प, खाणी आणि रासायनिक उद्योगांमुळे जंगलतोड, नदी प्रदूषण आणि स्थानिक पर्यावरणावर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
स्थानिकांना रोजगार देणारे आणि कोकणाच्या विकासाला हातभार लावणारे प्रकल्प हवेत. मात्र, जनतेच्या अस्तित्वावर घाला घालणारे प्रकल्प नकोत, असेही ते म्हणाले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना सपकाळ यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या अडचणी मांडल्या. सरकारने ३१० तालुके दुष्काळग्रस्त घोषित केल्याचे सांगितले असले, तरी मदतीच्या अंमलबजावणीत त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दिवाळी संपल्यानंतरही लाखो शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा दावा सपकाळ यांनी केला.
एकाच वेळी कायदा-सुव्यवस्था, महामार्ग, पर्यावरण आणि शेतकरी मदत अशा विविध मुद्द्यांवरून सपकाळ यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांच्या या विधानांवर सत्ताधारी पक्षांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.