रायगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महेंद्रशेठ घरत यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम
भारत राजनकर, उरण: विधानसभा निवडणूक जागावाटपासाठी सर्वच पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. मात्र यावरुन आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटातीस अंतर्गत वाद समोर येत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. पक्षातील इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले पदाधिकारी आणि आमदार आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याचं चित्र समोर आहे. त्यामुळे आता दोन्ही गटात चुरशीची लढत दिसून येत आहे. अशातच आता रायगड विधानसभा मतदार संघात काँंग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभांपैकी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला एकही उमेदवार न दिल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाले आहेत. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी याबाबत रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची भेट घेतली. पक्षाच्या यासगळ्या निर्णयांवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आग्रह केला. रविवारी 27 ऑक्टोबर 2024 रोजी हजारो कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांना भेटण्यासाठी शेलघर येथे आले होते. उपस्थित कार्यकर्त्यांशी घरत यांनी संवाद साधला व आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी घरत म्हणाले की, खरंतर लोकसभेची निवडणूक, मावळ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला पोषक होता .मात्र उद्धव ठाकरे गटानेआपला उमेदवार उभा केला व कोकणातील एकही सीट काँग्रेस पक्षाला मिळाली नाही.
घरत पुढे असंही म्हणाले की, विधानसभेत काँग्रेस पक्षाला न्याय मिळेल असा आशावाद होता. मात्र याही विधानसभेत रायगड जिल्ह्यात एकही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला न सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. जोपर्यंत महाराष्ट्र प्रदेशाचे नेते आदेश देत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पक्षाचे काम करायचे नाही असं घरत म्हणाले.तसंच बॅरिस्टर ए.आर.अंतुले साहेबांच्या रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा मतदारसंघ न देता भोपळा मिळाला. घरत यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रदेश चिटणीस तथा रायगड सहप्रभारी श्री. श्रीरंग बरगे यांच्यासमोर रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला आहे.
हेही वाचा-उरणच्या निवडणुकीत होणार काँटे की टक्कर ; तिसऱ्या आघाडीकडून ‘या’ नेत्याने भरला उमेदवारी अर्ज
जनतेच्या संवाद सभेसाठी रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उरण मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या मदतीशिवाय कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे, असं काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे उरण विधानसभेत काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादाची ठिणगी पेटली असून राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणूकीच्या रिंगणात कोणता पक्ष बाजी मारणार हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे.