manoj jarange patil claim OBCs attempt to create riots in Maratha reservation movement
परभणी : राज्यामध्ये परभणी प्रकरण आणि बीडमधील हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतले आहे. परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांचा कारागृहामध्ये मृत्यू झाल्यामुळे वातावरण आणखी तापले. यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्र दौरा करुन हा मुद्द्यावरुन आवाज उठवला. त्यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील परभणी दौरा करुन सुर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सुर्यवंशी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी जरांगे पाटील यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. तसेच ईव्हीएमच्या गोंधळामुळे आलेले हे सरकार सुर्यवंशींच्या मृत्यूचे खरे कारण मानत नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले. या प्रकरणामध्ये सामील असलेल्या पोलिसांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. तसेच कुटुंबियांना 1 कोटी रुपये आणि एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी सुर्यवंशी कुटुंबाकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
परभणीच्या या सुर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीवेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे काही फोटो देखील पाहिले. या फोटोंमध्ये आंदोलकांवर करण्यात आलेली मारहाण देखील त्यांना दाखवण्यात आली. तसेच महिला आंदोलकांना पुरुष पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये आता मनोज जरांगे पाटील हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुर्यवंशी कुटुंबियांचे सात्वन केले असून त्यांना धीर दिला आहे.
परभणी दौऱ्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, “राज्यात सगळे परेशान आहेत.शेतकरी अडचणीत आहेत.परभणी मस्साजोग प्रकरणामुळे राज्य अशांत आहे. आणि हे सगळे बंगल्यासाठी भांडत आहेत. छगन भुजबळ यांनीही कितीही नेते एकत्रित केले तरी आता त्यांना कुणी विचारणार नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मी आरक्षणाच्या आडवा येत नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आता तेच मुख्यमंत्री आहेत त्यांनी आता करून दाखवावे नाही तर आंदोलन परवडणार नाही,” असा इशारा जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मनोज जरांगे पाटील हे लवकरच मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उगारणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र निवडणुकीमध्ये न उतरण्याचा निर्णय घेतला होता. जरांगे पाटील यांना ओबीसीमधून सरसकट मराठा आरक्षण हवे आहे. त्यांची ही मागणी असून मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी आता मनोज जरांगे पाटील हे येत्या 25 जानेवारीपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहे.