Manoj Jarange News:
जालना : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर अनेक मुद्यांवरुन राजकारण रंगले आहे. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षण हा मुद्दा ऐरणीवर येणार आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उगारले आहे. जरांगे पाटील हे त्यांच्या अंतरवली सराटी येथे शनिवारपासून (दि.25) उपोषणावर बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाबरोबरच मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरुन देखील महायुती सरकारला घेरले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी अंतरवलीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षणाची राज्य सरकारकडे मागणी केली आहे. “आम्ही फक्त न्याय मागतोय. तुमचे मुंडके कापून मागत नाही. तुमचा बळी मागत नाही, आम्ही साधं आरक्षण मागतोय. तरीही देत नसाल तर ही गरिबांची थट्टा आहे. यांच्या सत्तेवर उद्या लोक थुंकतील,” असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेवरुन देखील राजकारण रंगले आहे. निवडणुकीच्यापूर्वी सर्व महिलांना योजनेचे पैसे देण्यात आले. मात्र आता निवडणुकीनंतर अर्जाची छाननी करण्यात येत असून यामधून अनेक अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहे. यामुळे विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन जरांगे पाटील यांनी देखील राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. जरांगे पाटील म्हणाले की,” बहिणींच्या मायेत सरकार दुरावा आणत आहे, त्यांच्यात भेदभाव आणि कंजूषी करू नका. टिळा लागेपर्यंत तुम्हाला सगळ्या बहिणी लागत होत्या. निवडून येताना सगळ्यांना पैसे द्यावे वाटत होते आणि आता पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे. लाडक्या बहिणीत सरकार जसे उघडे पडले, तसे आरक्षणात सरकारला उघडे पाडणार आहे,” असा निश्चिय मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे जरांगे पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “26 जानेवारीच्या सगळ्यांना शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा. सर्वांची प्रकृती आता ढासळत आहे. डॉक्टर तपासणी करत आहेत. अजून सरकारकडून कोणताही निरोप आलेला नाही. आम्ही सरकारच्या आशेवर नाही, यायचं नाही यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. गोरगरीबांचे प्रश्न हे सरकार सोडवत नाही. जुलमी राजवट आडवी उभी कापून हे दिवस आणले. पण आयत्या गादीवर बसून सरकारकडून प्रश्न सुटत नाहीत. जनता प्रजासत्ताक झाली असूनही लढावं लागत आहे हे दुर्दैवी आहे. असलं सरकार असूनही काही फायदा नाही,” असा घणाघात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.