Photo Credit-Team Navrashtra इमरजन्सी चित्रपटावरून संजय राऊतांची कंगना राणावतवर टीका
मुंबई: अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित इमर्जन्सी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. पण चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण केल्याचे आरोप होत आहेत. यावरून शिवसेनेच्या मुखपत्र सामनाच्या रोखठोक या सदरातून कडाडून टीका करण्यात आली आहे. “इंदिरा गांधी हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. पंडित नेहरू यांच्या पाठोपाठ आजच्या भारताची पायाभरणी इंदिरा गांधी यांनी केली. मात्र, कंगना रणौतने इंदिराजींना खलनायिका दाखवणारा इमर्जन्सी हा चित्रपट तयार केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. हीच इंदिरा गांधींची खरी ताकद आहे!” अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.
“कंगना राणावत या नटीने इंदिराजींना खलनायिका ठरवणारा `इमर्जन्सी’ हा चित्रपट काढला. बॉक्स ऑफिसवर तो साफ कोसळला. हीच इंदिरा गांधींची ताकद! कंगना राणावत हिचा `इमर्जन्सी’ हा सिनेमा आल्या आल्याच बॉक्स ऑफिसवर कोसळला, हे बरे झाले. खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. सत्य झाकले जात आहे. काही महाविद्वान लोक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत. ”
`इमर्जन्सी’ चित्रपटात इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवले आहे आणि त्या काळाचा संपूर्ण इतिहास मोडून-तोडून सादर केला आहे. इंदिरा गांधी यांना खलनायिका ठरवणे ही भारतीय इतिहासाची क्रूर थट्टा आहे. भारताचा एक भाग असलेल्या मुंबईस (जी महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे) मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या कंगना राणावतसारख्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी इंदिरा गांधी यांनी तेव्हा आणीबाणी लावली हे सत्य आहे. राष्ट्रीय सुरक्षेची गरज म्हणून लावलेल्या आणीबाणीस 50 वर्षे होऊन गेली. तरीही काही लोक ती राख अंगाला फासून फिरत आहेत. पोलिसांनी व सैन्याने सरकारचे आदेश पाळू नयेत असे जयप्रकाश नारायण, चरणसिंगांसारखे नेते जाहीर सभांतून चिथावणी देत होते.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी व आणीबाणीचे समर्थन केले होते. तरीही भाजप व शिवसेना 25 वर्षे एकत्र नांदले, सत्ता भोगली त्याचे काय? इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन करणारे असे चित्रपट व निर्मात्यांना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जाब विचारायला हवा. इंदिराजींचे नेतृत्व कणखर व पोलादी होते. देशातील आधारभूत परिवर्तनाच्या त्या नायिका होत्या. आजचा विकास म्हणजे इंदिराजींनी केलेल्या पायाभरणीचे फळ आहे. इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांचे तनखे एका झटक्यात बंद केले. “