"तरुणांच्या रोजगारासह महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील राहू "; योगेश कदम यांची ग्वाही
दापोली/समीर पिंपळकर : महायुती सरकारमुळेच अवघ्या अडीच वर्षात कोकाकोलासारखी आंतरराष्ट्रीय कंपनी लोटे येथे आणली. येत्या काही महिन्यातच कोकाकोला कंपनीच्या माध्यमातून साडेतीन हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे. कंपनीत केवळ स्थानिकांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. एकाही परप्रांतीयास स्थान नसेल, अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली.तालुका युवासेनेच्यावतीने पाटीदार भवन,भरणे येथे झालेल्या युवासेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. कदम म्हणाले की , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करत केवळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत विराजमान होण्यासाठी काँग्रेसशी सलगी करुन उद्धव ठाकरे यांनी कट्टर शिवसैनिकांना संपवण्याचे षडयंत्रच रचलं आहे, असा आरोप आमदार कदम यांनी केला. कोकाकोला कंपनीत वाहतुकीची वाहने देखील स्थानिकांचीच असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विकासाचे कागदावरचे आकडे न दाखवता प्रत्यक्षात विकासपूर्ती करून दापोली विधानसभा मतदार संघात २ हजार कोटीहून अधिक रुपयांच्या निधीतून विकासकामं सुरू आहेत,केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी विकासाचा डिंडोरा पिटणाऱ्या विरोधकांनी किती रुपयांचा निधी आणला, हे जाहीर करावे, असे आव्हान केले. खुले जातीपातीचे राजकारण न करताआपली बांधिलकी केवळ विकासाशीच आहे, हेच ध्येय डोळ्यासमोर आहे.
हेही वाचा-Vidhansabha 2024 : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात वादाची ठिणगी
आमदार योगेश कदम पुढे असंही म्हणाले की, जातीचे राजकारण केलेले नाही अन् करणारही नाही. युवकांनी राजकारण न करता समाजकारण करणं आवश्यक असून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी केलेली ताकद कदापिही व्यर्थ जावू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी भडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य अक्षय राणीम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
हेही वाचा-‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरु करण्याचे अमित शाह यांचे षडयंत्र’; संजय राऊतांचा घणाघात
यावेळी आमदार योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जि.प.सदस्य अरुण कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, युवासेना जिल्हाधिकारी चेतन सातोपे, उपजिल्हाधिकारी सचिन काते, तालुका अधिकारी मिलींद काते, सुरज रेवणे, शहर अधिकारी सिद्धेश खेडेकर, युवतीसेना तालुका अधिकारी सुप्रिया कदम, पूनम जाधव, श्रद्धा शिंदे, तालुका संघटक महेंद्र भोसले, ओंकार उसरे, श्रवण बुटाला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक, तीनबत्तीनाका ते पाटीदार भवनपर्यंत काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत युवासेनेचे पदाधिकारी बहुसंख्येने सहभागी झाले होते. मेळाव्यासही युवतीसेनेच्या कार्यकर्त्या हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.