

सुनेत्रा पवारांची रोहित पवारांनी मागितली माफी
त्यांना वाईट वाटलं असेल तर वैयक्तिकरित्या माफी मागतो - रोहित पवार
पुण्यातील गुन्हेगारीवरून प्रशासनावर निशाणा
Rohit Pawar on Sunetra Pawar : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सुरू झालेला राजकीय वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून व्यक्तिगत माफी मागितली आहे. मात्र, पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. अजित पवारांसारखा प्रशासनावर वचक निर्माण करणं कुणालाही शक्य नाही, असं स्पष्ट सांगत त्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाला लक्ष्य केलं.
पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, आपण बारामतीकर असून पुणे जिल्ह्याचे नागरिक आहोत. अजित पवार पालकमंत्री असताना पुणे शहर, ग्रामीण भाग आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रशासनाचा कारभार जवळून पाहिला आहे.
सुनेत्रा पवारांना आपल्या वक्तव्यामुळे वाईट वाटलं असेल तर त्यांची व्यक्तिगत माफी मागतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे भावनिक होऊन आपण ते वक्तव्य केल्याचंही त्यांनी सांगितलं.
अजित पवारांचा प्रशासनावर मोठा वचक होता. त्यांच्यासारखं काम आणि दरारा निर्माण करणं सहज शक्य नाही, अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली. पुण्यात बलात्कार, विनयभंग आणि कोयत्याने हल्ल्यांच्या घटना घडत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. पुण्यात गेल्या सहा महिन्यांत काय काय घडलं, याची यादी आपल्याकडे असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या सगळ्या घटनांविरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रोहित पवारांनी केली. विशेष म्हणजे, हे आंदोलन पूर्णपणे अराजकीय असेल. यात सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
आंदोलनाची तारीख काहीशी पुढे-मागे होऊ शकते. मात्र, आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव निर्माण करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असेल, असं ते म्हणाले.
दरम्यान, पक्षाच्या बैठकीत जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांच्या तयारीवरही चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. आता रोहित पवारांच्या माफीनंतर सुनेत्रा पवार यांची काय प्रतिक्रिया येते आणि पुण्यातील प्रस्तावित आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.