

शरद पवार गटाने डिलिमिटेशनला पाठिंबा दिल्याने संजय राऊत आक्रमक
महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हा अत्यंत दुर्दैवी निर्णय
पक्षात फूट पडली म्हणून विचारधारेशी तडजोड
Sanjay Raut on ncp politics : महाबळेश्वर : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या विधेयकाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘डिलिमिटेशन बिल म्हणजे लोकशाही संपवणारे विधेयक’ असल्याची टीका करत भाजपला २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच मतदारसंघांची पुनर्रचना करायची असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली.
महाबळेश्वर येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, भाजपचे राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले, डिलिमिटेशन बिल म्हणजे लोकशाही संपवणारे विधेयक. ५४३ खासदारांच्या जागी ८६० खासदार आणायचे आणि त्या ८६० मतदारसंघांची पुनर्रचना आपल्या मर्जीनुसार करायची, असा भाजपचा डाव आहे. जनतेच्या हातातील सत्ता खेचून घेण्याचे हे कारस्थान आहे."
पुढे ते म्हणाले, "भाजपच्या विजयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपचा कोणताही विजय गुणवत्तेच्या जोरावर झालेला नसल्याचा आरोप करत ते म्हणाले, "२०१४ मध्ये जनतेची फसवणूक करून आणि खोटे बोलून विजय मिळवला. त्यानंतर ईव्हीएम घोटाळा, मतचोरी, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव आणि जागांची चोरी असे प्रकार केले."
२०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बोलताना राऊत यांनी भाजपवर मतदारसंघांची पुनर्रचना आपल्या सोयीनुसार करण्याचा डाव आखल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "विरोधकांनी सर्व गोष्टी उघड केल्यानंतर आता २०२९ मध्ये विजय मिळवण्यासाठी आपल्या मर्जीनुसार मतदारसंघ निर्माण केले जातील. हे देशाच्या सुरक्षेसाठी आणि संघराज्य व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक आहे. लोकसभेत प्रचंड मताधिक्याने हे विधेयक आम्ही पराभूत केले होते. तेच विधेयक अमित शहा पुन्हा आणत असतील आणि त्यासाठी घोडेबाजार केला असेल, तर ही देशाच्या लोकशाहीसाठी अखेरची धोक्याची घंटा आहे."
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने या विधेयकाला पाठिंबा दिल्यास तो दुर्दैवी निर्णय असेल, असेही त्यांनी म्हटले. "राष्ट्रवादी काँग्रेसने खरोखर असा निर्णय घेतला असेल, तर तो त्यांच्या विचारधारेसाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत दुर्दैवी असेल. यापुढे अशा पक्षाने फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नये. तुमचे आठ खासदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आले आहेत, भाजपच्या माध्यमातून नाही. आठपैकी पाच ठिकाणी आपण भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. अशा वेळी एकतर्फी सरकारच्या बाजूने उभे राहणे महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही."
पुढे संजय राऊत म्हणाले, "शरद पवार यांची प्रकृती अत्यंत अस्वस्थ आहे. ते रुग्णालयात दाखल आहेत. कोणताही निर्णय घेण्याच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत ते सध्या नाहीत. त्यांची विचारधारा टिकवण्याची जबाबदारी त्यांच्या सहकाऱ्यांची होती, पण त्यांनी माती खाल्ली. पक्षात फूट पडली म्हणून विचारधारेशी तडजोड करता कामा नये. आमचेही सहा खासदार फोडले, म्हणून आम्ही अमित शहांच्या पायाशी गेलो नाही. आम्ही लढत राहिलो. आमदार-खासदार येतील आणि जातील, पक्ष फुटतील; पण देश आणि महाराष्ट्र महत्त्वाचा आहे."
संजय राऊत यांनी डिलिमिटेशन विधेयकाबाबत काय आरोप केला आहे?
डिलिमिटेशन विधेयक म्हणजे लोकशाही संपवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. भाजपला ५४३ ऐवजी ८६० लोकसभा मतदारसंघ करून आपल्या मर्जीनुसार त्यांची पुनर्रचना करायची असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या भूमिकेवर संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यास तो पक्षाच्या विचारधारेसाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दुर्दैवी निर्णय असेल, असे संजय राऊत म्हणाले.
डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी खासदारांना १५० कोटींचे आमिष दाखवल्याचा आरोप कोणी केला?
खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केला. विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या खासदारांना प्रत्येकी १५० कोटी रुपयांचा भाव असल्याचा दावा त्यांनी केला. हा त्यांच्याकडून करण्यात आलेला आरोप आहे.