Sunil Tatkare explained why Dhananjay Munde was not given the guardian minister of Beed
शिर्डी : शिर्डीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर पार पडले आहे. यामध्ये सर्व नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित राहिले आहेत. यावेळी पक्षाचे नेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आगामी निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा तयारीला लागण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. यामध्येच काल (दि.18) रात्री उशीरा पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यात आले नाही. यावर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. आरोपी वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये अर्थिक व निकटचे संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली गेली आहे. तसेच पालकमंत्री पद न देण्याची देखील मागणी केली गेली होती. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे धनंजय मुंडे यांना बीडचे पालकत्व देण्यात आलेले नाही. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच स्वीकारले आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुनील तटकरे यांनी शिबीरानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. माध्यमांनी धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद न देण्यावरुन तटकरे यांना सवाल केला. यावर तटकरे म्हणाले की, “धनंजय मुंडेंनी बीडमध्ये प्रदीर्घकाळ काम केलं आहे. कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद द्यायाचं? याचा निर्णय महायुतीच्या तीन्ही पक्षातील प्रमुखांनी बसून निर्णय घेतला आहे,” असे मत सुनीस तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद नाकारण्यात आले आहे. त्याऐवजी सुनील तटकरे यांच्या कन्या व मंत्री आदिती तटकरे यांना संधी देण्यात आली आहे. यावरुन मोठा राडा देखील रायगडमध्ये गोगावलेंच्या समर्थकांनी केला आहे. त्यांच्या या नाराजीवर सुनील तटकरे म्हणाले की, “ठीक आहे, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं. त्यामुळे जो निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला आहे. त्या निर्णयाचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. \
काय म्हणाले नाराज भरत गोगावले?
शिंंदे गटाचे नेते भरत गोगावले व दादा भुसे यांना पालकमंत्री पदासाठी संधी देण्यात आलेली नाही. यावरुन शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे होत्या. आदिती तटकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली आहे. यावरुन नाराजी व्यक्त करताना भरत गोगावले म्हणाले की, मच्या सहाच्या सहा आमदारांनी (रायगडच्या) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कळवलं होतं. सर्वांना भेटी घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर जिल्ह्यातही वातावरण झालं होतं की भरत गोगावले हेच पालकमंत्री व्हावेत. मात्र, आता जे केलं ते अनपेक्षित आहे. पण ठीक आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल”, असे मत भरत गोगावले यांनी व्यक्त केले.